विदर्भाने एकदा का निर्णय केला की तो देशात पोहोचतो. विदर्भवासियांची ही वज्रमुठ राज्य सरकारला विचारतेय की गेल्या १० महिन्यांत काय दिवे लावलेत. या सरकारने दिले काय, कोणते नवे प्रकल्प आणले. असे कोणते निर्णय घेण्यात आले, जेणेकरून विदर्भवासियांना वाटेल की आपला नेता सरकारमध्ये काम करतोय, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला.
आता मला कोणताही माइकालाल मैदानात रोखू शकणार नाही; अनिल देशमुखांचे ईडी कारवाईवरून आव्हान
नागपुरातील वज्रमुठ सभेत ते बोलत होते. महाराष्ट्राला एकच लक्षात आलेय या सरकाने सुडाचे राजकारण दिलेय. हे महाराष्ट्रात सतत सुरु आहे. आणखी एक गोष्ट सरकारने केली. सत्तेत आल्या आल्या अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाच्या कामांना स्थगिती दिली. कोर्टात गेलो, कोर्टाने आदेश दिले तरी हे नतद्रष्ट सरकार आजही कामांवरील स्थगिती उठविण्यास तयार नाहीय, असा आरोप पाटील यांनी केला.
मोठमोठे प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेले. परंतू मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्या मालकांना साधे विचारायलाही गेले नाहीत. कारण शेजारच्या राज्याच्या मालकाला राग आला तर काय होईल अशा विचारात हे लोक आहेत. ज्यांनी ज्यांनी या सरकारवर विडंबनात्मक गाणी केली, कृती केली त्यांना तुरंगात टाकण्याचे काम सरकार करत आहे. आपल्या विरोधी बोलेल त्याला सर्वप्रकारचा त्रास द्यायचा याव्यतिरीक्त या सरकारने काहीही काम केलेले नाही, असा आरोप सरकारवर केला.
महाराष्ट्रात आम्ही आजवर शिवाजी महाराजांचा अवमान सहन केला नव्हता. परंतू राज्यपाल दिवसाढवळ्या शिवाजी महाराजांचा अवमान करत होते. हे बहुजनांचे सरकार नाहीय हे जनतेला माहिती आहे. महाराष्ट्र वाट पाहतोय आता कधी निवडणुकी घेतील. परंतू हे सरकार निवडणूक घेत नाहीय. लोक कशामुळे गोळा होतील, लोकं जमतील कशामुळे हे पाहून सरकार गर्दी जमवत आहे. महाराष्ट्र दुधखुळा नाहीय, असा टोला पाटील यांनी लगावला.
उद्धव ठाकरे जे सोडून गेलेत त्या लोकांना गद्दार म्हणतात. त्यांना मी सांगू इच्छितो, कुछ तो मजबुरी रही होंगी, युही कोई बेवफा नही होता... काहीतरी अडचण असेल, कुठेतरी नस दाबली असेल, काहीतरी मजबुरी असेल समजून घ्या आता काय करणार... असे म्हणत सगळ्या शिवसैनिकांना मातोश्री आणि तुमचा जो आदर आहे तो कायम आहे, असे जयंत पाटलांनी म्हणताच उद्धव ठाकरे आणि अजित पवारांच्या चेहऱ्यावर हसू आले.