नागपूर : ग्रामपंचायत निवडणूकीच्या जय पराजयाबाबत सत्ताधारी-विरोधकांकडून दावे प्रतिदावे सुरूच आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप व महायुतीचीच सरशी झाल्याचा दावा केला आहे. महाविकास आघाडीकडे असणाऱ्या बहुतांश ग्रामपंचायती भाजपाकडे आल्या आहेत. महायुती सरकारने थेट सरपंच निवडून आणण्याचा निर्णय घेतला त्यामुळे पळवापळवी थांबली आहे. नाना पटोले यांनी पराभव मान्य करायला हवा, असे प्रतिपादन त्यांनी केले. नागपुरात मंगळवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्य शासन मराठा आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. उद्धव ठाकरे यांनी मात्र मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला होता. आता ते आरक्षणाची भाषा करत आहेत. आज जे दिवस महाराष्ट्रात दिसत आहे, जी जाळपोळ सुरू आहे व ओबीसी आणि मराठा समाज एकमेकांसमोर आला आहे त्यासाठी उद्धव ठाकरेच हेच जबाबदार आहेत. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदासाठी बहुमत मिळाले होते. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांना मुख्यमंत्री होऊ दिले असते तर मराठा समाजाचे आरक्षण सुप्रीम कोर्टातही टिकवून ठेवले असते. मराठा समाजाला न्याय मिळवून दिला असता, असे ते म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांची भूमिका सर्वपक्षीय बैठकीत ठरल्याप्रमाणे आहे. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा गुंता सोडवण्यासाठी काम करावे असे ठरले होते. मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का बसू नये, असेच भुजबळ म्हणत आहेत, असे ते म्हणाले.