निशांत वानखेडे
नागपूर : अभियंते घडविणाऱ्या ‘व्हीएनआयटी’च्या कॅम्पसमध्ये सुटाबुटातील पाहुण्यांमध्ये पारंपरिक आदिवासी वेशात पाेहोचलेल्या उजीयाराेबाई केवटीया. मध्य प्रदेशच्या दिंडाेरी जिल्ह्यातील समनापूर काेंडी गावातील रहिवासी. जंगलताेडीमुळे अन्न हिरावल्याने पेटून उठलेल्या आदिवासींचे नेतृत्व करणाऱ्या उजीयाराेबाई यांच्या धाडसामुळेच दिंडाेरी जिल्ह्यातील १५०० एकर जंगल आज शाबूत राहिले. याच जंगलात पारंपरिक मिलेट्सची बीजबँक’ तयार करणाऱ्या उजीयाराेबाईंना म्हणूनच मिलेट्सच्या राष्ट्रीय परिषदेत येण्याचा मान मिळाला.
पाहुणे आणि तरुण विद्यार्थी त्यांच्यासाेबत सेल्फी घेत असताना थाेडा वेळ काढून त्या ‘लाेकमत’शी बाेलत्या झाल्या. वर्ष २००० च्या आसपास जंगलमाफियांची नजर त्यांच्या गावातील जंगलावर पडली. साेबतीला जंगलावर अधिकार सांगणारे प्रशासनही हाेतेच. मग झाडांची कत्तल सुरू झाली. या वृक्षताेडीत आदिवासींचे खाद्य असलेली ४३ प्रकारची रानभाजी, १८ प्रकारचे कंदमुळे, १२ प्रकारचे मशरूम आणि ४२ प्रजातीचे रानफळे नष्ट झाली. वनवे लावले गेले. जंगलातील पाणी आटले, मुलाबाळांचे भाेजन संपले.
भरडधान्याचे महत्त्व सांगण्याकरिता आदिवासी क्षेत्रातील विनिता पोहचली न्यूयॉर्कमध्ये
राेजगार आणि अन्न हिरावल्याने भुकेमुळे या जिल्ह्यातील आदिवासी पेटून उठला. पहिला लढा उभारणारी उजीयाराेबाई यांची प्रेरणा मिळाली. गावातील लाेकांना एकत्र करून आवाज उचलणाऱ्या उजीयाराेबाईंचा आवाज आसपासच्या गावात पाेहोचला आणि लढा सुरू झाला. त्यामुळे सरकारला नमावे लागले. जंगलाला आग लागू नये म्हणून प्रयत्न सुरू झाले. हळूहळू जंगल बहरले. जलस्त्राेत भरले, जमीन सुपीक झाली आणि या जिल्ह्यातील १५०० एकराचे जंगल पुन्हा हिरवेगार झाले.
मिलेट्सची ‘बीजबँक’ही बनविली
जंगलातील काेदाे-कुटकी, रागी, सावळ, सिकिया, सलार, ज्वार, बाजरा अशा पारंपरिक मिलेट्सचे महत्त्व उजीयाराेबाईंनी ओळखले. गावातील १० महिलांना घेऊन समूह तयार केला व या मिलेट्सची बीजबँक तयार केली. आज गावातील १०० वर महिला त्यांच्या समूहात आहेत. मात्र ‘न्यू सीड’च्या माध्यमातून त्यांचे कार्य दिंडाेरी जिल्ह्यातील ५२ गावांपर्यंत हे अभियान पाेहोचले व ५५०० च्यावर महिलांची संघटना उभी राहिली.