नागपूर : कधी पाऊस, तर कधी कडक उन्ह अशा संमिश्र वातावरणामुळे हा आठवडा उकाडा वाढविणारा असणार आहे. हवामान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यात पुढचे दोन दिवस पावसाचे वर्तविले आहेत, तर तीन दिवस शुष्क वातावरण राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
नागपुरातील सोमावारचे तापमान ०.७ अंश सेल्सिअसने वाढून ३८.६ अशी नोंद झाली. सकाळी वातावरण थंड होते. सकाळी आर्द्रता ७१ टक्के नोंदविली गेली, तर सायंकाळी ४३ टक्के नोंदविण्यात आली. सायंकाळनंतर वातावरणातील उकाडा वाढलेला जाणवला.
विदर्भामध्ये गडचिरोलीचे तापमान सर्वांत कमी ३७.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. तिथे गेल्या २४ तासात १० मिमी पावसाची नोंद झाली. तर अकोलाचे सर्वाधिक म्हणजे ४१.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. या सोबतच, वाशिम ३८, नागपूर ३८.६, गोंदीया ३८.८ तर अमरावती आणि बुलढाणाचे ३९ व चंद्रपूरचे तापमान ३९.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. वर्धामध्ये ४० आणि यवतमाळात ४१ अंश सेल्सिअसची नोंद झाली.