नागपूर : नागपुरात युवा सेनेत असलेली गटबाजी मुंबईपर्यंत पोहोचली आहे. पक्षाने दिलेल्या कार्यक्रमांनाही गटबाजीचे ग्रहण लागले. याची गंभीर दखल युवा सेनेचे राष्ट्रीय सचिव वरुण सरदेसाई यांनी घेतली. गटबाजी करणाऱ्या दोन्ही प्रमुख पदाधिकाऱ्यांचे कान टोचत आपसात समन्वय साधण्यासाठी एक महिन्याचा अल्टिमेटम दिला. अन्यथा संघटनेत फेरबदल केले जातील, असा इशाराही दिला.
युवा सेनेत असलेला वाद मिटविण्यासाठी मुंबईहून पदाधिकाऱ्यांची चमू गुरुवारी नागपुरात दाखल झाली. रविभवनात आयोजित बैठकीत राष्ट्रीय सचिव वरुण सरदेसाई यांच्यासह युवा सेनेचे कार्यकारी सदस्य रूपेश कदम, मुंबईचे नगरसेवक अमय घोले, योगेश निमसे, धरम मिश्रा, मंगेश चिवटे पर्यवेक्षक म्हणून उपस्थित होते. बैठकीत जिल्हाप्रमुख विक्रम राठोड व हितेश यादव यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून विधानसभानिहाय कामाचा आढावा घेण्यात आला. पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम करण्याच्या तसेच नव्या दमाच्या युवकांना संधी देण्याच्या सूचना देण्यात आल्या. महापालिकेची आगामी निवडणूक पाहता वॉर्डस्तरावर १० प्रमुख पदाधिकाऱ्यांची चमू नियुक्त करून संघटन बळकट करण्याचे निर्देश देण्यात आले. विशेष म्हणजे मुंबईहून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी आधीच स्थानिक माहिती घेतली होती. त्यामुळे चुकीची माहिती देणाऱ्या पदाधिकाऱ्यांना वेळीच रोखण्यात आले. जिल्हाप्रमुख हितेश यादव व विक्रम राठोड यांनी संघटनेच्या कामाची माहिती दिली.