लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : तालुक्यातील इंदापूर येथे घराला आग लागल्याने कुटुंब उघड्यावर आले. हाेते नव्हते सारेच आगीमुळे जळून खाक झाले. या आगपीडित कुटुंबाच्या दु:खावर फुंकर घालण्यासाठी साेबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. आगीच्या घटनेमुळे उघड्यावर आलेल्या कुटुंबाचा संसार आता पुन्हा नव्या उमेदीने उभा हाेऊ पहात आहे.
अर्चना विनाेद मरापे, रा. इंदापूर असे आगपीडित कुटुंबातील महिलेचे नाव असून, त्या भिवापूर पंचायत समितीअंतर्गत ‘उमेद’ अभियानात आर्थिक साक्षरता सखी म्हणून कार्यरत आहे. १४ एप्रिल राेजी आगीमुळे त्यांच्या स्वप्नांची राखरांगाेळी झाली. राहत्या घराला अचानक आग लागल्याने संपूर्ण कपडे, अन्नधान्य, घरगुती साहित्य व राेख ३५ हजार रुपये जळून खाक झाले. क्षणात कुटुंब उघड्यावर आले. याबाबत तालुका अभियान कक्षाला माहिती मिळताच कार्यरत प्रत्येकांने अर्चना मरापे यांना मदत करण्याचा निर्धार केला. यासाठी अधिकारी, कर्मचारी, सीआरपी, एलसीआरपी, एफएलसीआरपी, बँक सखी, ग्रामसंघ पदाधिकारी व स्वयंसहायता समूह सदस्यांनी एकत्रित येऊन मदतीचा हात दिला आहे. शक्य तितक्या आर्थिक मदतीसह १.५ क्विंटल गहू, ६० किलो तांदूळ मदतीच्या स्वरूपात अर्चनाला देण्यात आले. ‘उमेद’ने दिलेला मदतीचा हात उघड्यावर पडलेल्या कुटुंबीयांना पुन्हा नव्या उमेदीने उभे करण्यास माेलाचा ठरला आहे. यावेळी अभियानाचे व्यवस्थापक रवींद्र शेंडे, आरती तिमांडे, चिरंजित बुरांडे, रक्षना नगराळे आदी उपस्थित होते.