लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गरीब, वंचित व पीडितांसाठी आयुष्यभर संघर्षरत असलेल्या उमेशबाबूंनी समाजसेवेला वाहून घेतले होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेशबाबू चौबे एक आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व होते. उपेक्षितांना न्याय देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. अन्यायाच्या विरोधात आपल्या लेखणीचाही वापर केला. त्यांनी विचाराशी कधी तडजोड केली नाही. त्यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून वंचितांना व अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. वसंतराव देशपांडे सभागृह येथे रविवारी विदर्भ गौरव प्रतिष्ठान व उमेशबाबू चौबे मित्र परिवार यांच्या वतीने स्व. उमेशबाबू चौबे श्रद्धांजली सभेत मुख्यमंत्री बोलत होते.यावेळी तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार विकास महात्मे, माजी खासदार दत्ता मेघे, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, आमदार डॉ. मिलिंद माने,आशिष देशमुख, माजी महापौर अटलबहादूर सिंग, ज्येष्ठ पत्रकार एस.एन.विनोद, मनपातील विरोधीपक्षनेते तानाजी वनवे, माजी आमदार यादवराव देवगडे,एस.क्यू. जमा, गिरीश गांधी, अजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, उमेशबाबू चौबे यांनी कायम वंचित आणि अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. वंचित आणि अन्यायग्रस्तांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने करण्यात ते नेहमी अग्रभागी असत. आपल्या पत्रकारितेतूनही त्यांनी नेहमीच अन्यायाला वाचा फोडली. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यातही उमेशबाबूंनी स्वत:ला झोकून दिले. उमेशबाबूंनी आपल्या विचारांशी आणि सिद्धांताशी कधीही तडजोड केली नाही.आपल्या संपूर्ण संघर्षमय जीवनात त्यांनी कुणाशीही शत्रुत्व मात्र ठेवले नाही. वंचितांना व अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर येथील पत्रकारिता विभागातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांस त्यांच्या नावे सुवर्णपदक प्रदान करण्यात येईल तसेच उमेशबाबू चौबे यांचे अप्रकाशित लेख पुस्तकरुपाने प्रकाशित करण्याचा मानस देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.बनवारीलाल पुरोहित म्हणाले, उमेशबाबूंनी आपले सारे आयुष्य गोरगरिबांच्या सेवेसाठी, वंचित व अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी व्यतित केले. समाजातील विविध वंचित घटकांसाठी त्यांनी सतत संघर्ष केला. त्यांनी आपली पत्रकारिताही सडेतोडपणे केली. अतिशय साधेपणाने जीवन जगणाºया उमेशबाबूंनी सिद्धांतांबाबत कधीही तडजोड केली नाही.मुख्यमंत्री म्हणाले, वंचित व पीडितांना सर्व दरवाजे बंद झाल्यानंतर उमेशबाबू यांचा दरवाजा उघडा असायचा. अंधश्रद्धा निर्र्मूलन समितीच्या माध्यमातून त्यांनी अनिष्ट प्रथांच्या विरोधात आंदोलन केले. माझ्या वडिलांसोबत त्यांचे भावासारखे संबंध होते. मी महापौर झालो तेव्हा त्यांना आनंद झाला होता. ते मला भेटायला आले. परंतु त्यांनी माझ्याही विरोधात सफाई कामगारांसाठी आंदोलन केले.राज्यपाल बनवारीलाल पुरोहित म्हणाले, उमेशबाबू उच्च विचाराचे पत्रकार होते. भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांनी आपल्या लेखणीचा वापर केला. गोरगरिबांसाठी ते लढले. जीन प्रेस कामगार, कुली, आॅटोरिक्षा, छोटे दुकानदार अशा विविध क्षेत्रातील कामगारांसाठी ते लढले. त्यांचे जीवन संघर्षात गेले.नितीन गडकरी म्हणाले, उमेशबाबू यांनी ५० वर्षांत सर्वसामान्यांसाठी संघर्ष केला. त्यांच्यासोबत अनेकदा कारागृहात जाण्याचा योग आला. त्यांनी राजकारणात कधी तडजोड केली नाही. अन्यायाच्या विरोधात सर्वसामान्यांच्या मदतीसाठी ते धावून जायचे.सर्वसामान्यासाठी त्यांनी आंदोलन केले. त्यांच्या कार्यातून आजच्या पिढीने प्रेरणा घ्यावी .मी व उमेशबाबू चौबे १९६६ साली एकत्र आलो. विद्यापीठात आम्ही एकत्र लढलो. ते निर्भीड होते, सामान्यावरील अन्यायाच्या विरोधात पेटून उठायचे. पुस्तकाचे प्रकाशन करावे हीच त्यांना खरी श्रद्धांजली होईल, असे प्रतिपादन अटलबहादूर सिंग यांनी केले.तानाजी वनवे व गिरीश गांधी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन श्रमिक पत्रकार ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी केले. उपस्थितांनी उमेशबाबू चौबे यांना श्रद्धांजली वाहिली.
वंचितांना न्याय मिळवून देणे हीच उमेशबाबूंना श्रद्धांजली; देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 11:26 AM
गरीब, वंचित व पीडितांसाठी आयुष्यभर संघर्षरत असलेल्या उमेशबाबूंच्या विचारांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून वंचितांना व अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
ठळक मुद्देउमेशबाबूंचे अप्रकाशित लेख पुस्तक स्वरुपात प्रकाशित करणार