नागपूर : अमरावती येथील उमेश कोल्हे हत्याप्रकरणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची चौकशी करण्याची घोषणा सरकारने शुक्रवारी विधानसभेत केली. भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्यानंतर उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण दाबण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस यंत्रणेवर दबाव आणला होता का? याची चौकशी गुप्तचर विभागाच्या आयुक्तांमार्फत करण्यात येईल. त्याचा अहवाल पंधरा दिवसांत मागविण्यात येईल, अशी घोषणा गृह विभागाचे प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत केली.
भाजपचे आमदार राम सातपुते यांनी अहमदनगर जिल्ह्यात ख्रिश्चन मिशनऱ्यांमार्फत सुरू असलेल्या धर्मांतरणाचा मुद्दा लक्षवेधीद्वारे सभागृहात मांडला. त्यावेळी अपक्ष आमदार रवी राणा यांनी कोल्हे यांच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या ठाकरे यांनी ही केस दाबण्याचा प्रयत्न केला. फोन करून पोलिस यंत्रणेवर दबाव आणला. धार्मिक कारणातून ही हत्या झाली असताना या हत्येला दरोड्याचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या भूमिकेची चौकशी व्हावी, अशी मागणी राणा यांनी केली. त्यावर प्रभारी मंत्री देसाई यांनी उद्धव ठाकरे यांची चौकशी करून त्याचा अहवाल पंधरा दिवसांत गुप्तचर आयुक्तांमार्फत मागविण्यात येईल, अशी घोषणा केली.
पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांचीही चौकशी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे मिराबाई हरेल या महिलेने पंजाब येथून आलेल्या ख्रिश्चन मिशनरी कमल सिंग याच्याकडून धर्मांतरासाठी आमिष दाखविले म्हणून तक्रार करूनही तेथील पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी कोणतीही कारवाई केली नाही. उलट धर्मांतरण करणाऱ्याला पाठीशी घातले, असा आरोप आमदार राम सातपुते यांनी सभागृहात केला. याप्रकरणी दराडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही सातपुते यांनी केली. त्यावर देसाई यांनी दराडे यांची जिल्हा पोलिस नियंत्रण कक्षात बदली करून त्यांची अतिरिक्त पोलिस अधीक्षकांमार्फत चौकशी करण्यात येईल. तसेच त्यांच्या संपत्तीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी केली जाईल, असे सांगितले.
‘...तर, कडू आणि राणा यांचीही चाैकशी करा’ आमदार रवी राणा एवढे महत्त्वाचे असेल तर आधी त्यांनी खोके घेण्याचा ज्यांच्यावर आरोप केला त्या बच्चू कडूंची चाैकशी व्हावी. तसेच बच्चू कडू यांनी केलेल्या आरोपामुळे रवी राणा यांचीही चाैकशी व्हावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. उमेश कोल्हे प्रकरणात उद्धव ठाकरे यांची चाैकशी करण्याच्या राज्य सरकारच्या घोषणेनंतर दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना हा पलटवार केला.