नागपूर - भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या वडिलांचे निधन झाले. तिलक यादव यांनी बुधवार २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास वयाच्या ७४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारांना प्रतिसाद देत नसल्यामुळे दोन दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते.
उत्तर प्रदेशमधील पडरौना येथून नोकरीच्या निमित्ताने तिलक यादव नागपूरमध्ये आले होते. कोळसा खाणीत काम मिळाल्यानंतर त्यांनी नागपूरमध्येच वास्तव्य केलं. त्यांना कुस्तीची मोठी आवाड होती, तर मुलगा उमेशन पोलीस किंवा सैन्य दलात भरती व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. मात्र, उमेश पुढे जाऊन रणजी क्रिकेट खेळू लागला. त्यातून पुढे भारतीय संघात उमेशला संधी मिळाली. तर, २०१० मध्ये आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सने त्याच्यावर बोली लावली. नोव्हेंबर २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध यादवने कसोटीत पदार्पण केले. तो विदर्भाकडून कसोटीत खेळणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला.