लाेकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : तालुक्यात मंगळवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे तालुक्यातील उमरेड-कळमना मार्गावरील वाहतूक बराच वेळ बंद राहिल्याने पावसाचा या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही फटका बसला. मध्येच अडकून पडल्याने प्रवाशांची माेठी गैरसाेय झाली हाेती.
उमरेड-कळमना मार्गावर माेठे नाले आहेत. पावसामुळे त्या नाल्यांना पूर आला आणि पुराचे पाणी पुलावरून वाहायला सुरुवात झाली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली हाेती. दुसरीकडे, उमरेड-बेला मार्गही दिवसभर बंद हाेता. विशेष म्हणजे, थोडा जरी पाऊस काेसळला तरी उमरेड-कळमना मार्गावरील वाहतूक बंद होते. सायंकाळपर्यंत पुलावरून पाणी वाहत असल्याने लोहारा, डोंगरगाव, चिखलधोकडा, आमघाट, शेडेश्वर आदी गावांमधील नागरिकांची गैरसाेय झाली हाेती. ही समस्या कायमची साेडविण्यासाठी उंच पुलाचे बांधकाम करण्याची मागणी भावेश मोहतकर, आशिष धतुरिया, हरीश डोये यांनी केली आहे.