नागपूर : उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळण्याची प्रक्रिया दृष्टिक्षेपात आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने महाराष्ट्र वन विभागाला या संदर्भातील तांत्रिक प्रक्रियेच्या पूर्ततेच्या दृष्टीने कामी लागण्यास सांगितले आहे. राज्यातील २० व्याघ्र प्रकल्पातील प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) आणि क्षेत्र संचालकांची बैठक बुधवारी नागपुरात प्रारंभ झाली. त्यात हे सुचविण्यात आले.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची ही सूचना उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्याच्या विकासाला चालना देणारी मानली जात आहे. यामुळे वाघाच्या संरक्षण कार्यासाठी केंद्रीय निधी मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. भौगोलिक दृष्ट्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांच्या मध्ये हे अभयारण्य आहे.
एनटीसीएने आयोजित केलेल्या या दोन दिवसीय परिषदेला एडीजी आणि एनटीसीएचे सदस्य सचिव डॉ. एस.पी यादव आणि डीआयजी सुरेंद्र मेहरा यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यात मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, ओडिशा आणि छत्तीसगड या पाच राज्यातील व्याघ्र प्रकल्पांचे क्षेत्र संचालक आणि प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) उपस्थित आहेत. पहिल्या दिवशी मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिशा आणि छत्तीसगड राज्यातील क्षेत्र संचालकांनी सादरीकरण केले. गुरुवारी महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पातील सहा सादरीकरणे होणार आहेत.
...
टीसीपी नाही तर, केंद्रीय निधी नाही
आपापल्या क्षेत्रातील प्रलंबित असलेल्या व्याघ्र संवर्धनाच्या योजना आधी मार्गी लावाव्यात, त्यानंतरच केंद्रीय निधी मिळेल, अन्यथा तो दिला जाणार नाही, असा इशारा डॉ. यादव यांनी दिला. तसेच, प्रभावी व्यवस्थापन आणि मूल्यांकन कार्यक्रमात चांगला स्कोअर असलेल्या व्याघ्र प्रकल्पांसाठी अतिरिक्त फंडांचा विचार केला जाईल, असो त्यांनी सांगितले.
...
आज सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी बैठक
पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी गुरुवारी आढावा बैठक होणार आहे. व्याघ्र पुनर्प्राप्ती कार्यक्रमात तीन मुद्द्यांवर योजना आखण्यात आली आहे. यात वाघांची नैसर्गिक संख्या वाढविणे, व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेर वाघांच्या भ्रमणमार्गांचे जतन करणे आणि पहिली दोन उद्दिष्टे अयशस्वी झाल्यास उच्च घनतेच्या क्षेत्रामधून वाघांचे स्थानांतरण करणे या मुद्द्यांचा समावेश आहे.
...