उमरेड : पंतप्रधान गरीब कल्याण योजना मागील दोन महिन्यापासून सुरू झाली आहे. मे आणि जून महिन्यात जिल्ह्यात वितरण व्यवस्थेत उमरेड तालुका आघाडीवर आहे. तालुक्याला प्राधान्य आणि अंत्योदय कार्डधारकांसाठी एकूण २,२७० क्विंटल तांदूळ दर महिन्याला प्राप्त झाला. शिवाय उपरोक्त दोन्ही कार्डधारकांसाठी ३,३३० क्विंटल गहू या योजनेत मिळालेला आहे.
यापैकी मागील महिन्यात ९८ टक्के वितरण झाले. जून महिन्यात आतापावेतो ८३.४५ टक्के धान्य वितरित करण्यात आले. अन्य तालुक्याच्या आकडेवारीत उमरेड तालुका वितरणात सरस आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत प्रती व्यक्ती ५ किलो धान्य वितरित केल्या जात आहे. यामध्ये ३ किलो गहू आणि २ किलो तांदळाचा समावेश आहे. दुसरीकडे अंत्योदय कार्डधारकांना प्रती कार्ड १५ किलो गहू (२ रुपये किलो) आणि २० किलो तांदूळ (३ रुपये किलो) दिला जातो. लाल कार्डधारकांनाही मोफत धान्य योजना जाहीर करा, अशी मागणी केली जात आहे.
उमरेड तालुक्यात स्वस्त धान्य दुकानांची संख्या ८८ आहे. तालुक्यात ३९,८४७ एकूण कार्डधारक असून यामध्ये ३,६४५ बीपीएल (पिवळे कार्डधारक), ४,१५२ अंत्योदय, १३,४५९ केशरी तर २,१०८ शुभ्र कार्डधारकांची आकडेवारी आहे.
-
आम्ही वितरण व्यवस्था अत्यंत काटेकोरपणे राबवित असतो. त्याचे योग्य नियोजन आखल्या जाते. शिवाय प्रत्येक बाबींची नोंद ठेवतो. शिवाय स्वस्त धान्य दुकानदारसुद्धा वितरण योग्यरीत्या करतात. कार्डधारकांचे अंगठे सुद्धा घेतले जात आहेत. या संपूर्ण बाबी नियोजनाचा भाग असून यामुळेच तालुका धान्य वितरणात आघाडीवर दिसून येतो.
राहुल बहादूरकर
निरीक्षण अधिकारी, उमरेड उपविभाग