जितेंद्र ढवळे, नागपूरMaharashtra Election 2024: पंधरा वर्षांपासून उमरेड या अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघातील सत्ताकारण 'पारवे' या नावाभोवती फिरत आहे. विधानसभेतही पारवे विरुद्ध पारवे असा सामना रंगण्याची चर्चा असताना उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी शिंदेसेनेत असलेले माजी आमदार राजू पारवे यांनी माघार घेतली. मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश घेतला. त्यामुळे ११ उमेदवार रिंगणात असलेल्या उमरेडमध्ये यावेळी महायुतीचे (भाजप) सुधीर पारवे, महाविकास आघाडीचे (काँग्रेस) संजय मेश्राम आणि भाजप बंडखोर प्रमोद घरडे यांच्यात तिरंगी सामना होताना दिसतोय.
इकडे भाजपचे सुधीर आणि राजू पारवे एकत्र असताना काँग्रेसचे दलित कार्ड किती प्रभावी ठरेल, याकडे राजकीय पंडितांचे लक्ष लागले आहे. 'सोशल इंजिनिअरिंग'वर विश्वास ठेवणाऱ्या काँग्रेसला उमरेडमध्ये चमत्काराची अपेक्षा आहे, तर लाडक्या बहिणींचा आशीर्वाद घेत भाजपही ताकदीने मैदानात उतरला आहे.
डबल इंजिन की हिंदू दलित कार्ड?
लोकसभा निवडणुकीत पारवे बंधूंचे डबल इंजिन आणि हिंदू-दलित कार्ड फॉर्म्यूला सोबत असतानाही उमरेडमध्ये १४ हजार ८७९ मतांची आघाडी घेत काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांनी रामटेकचा गड सर केला होता. आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसला रामराम करणाऱ्या राजू पारवे यांना मतदारांनी नाकारले.
त्यामुळे विधानसभेत उमरेडची जागा भाजपनेच लढावी, यासाठी पदाधिकारी सुरुवातीपासूनच आक्रमक होते. अखेरच्या क्षणी सुधीर पारवेंना भाजप नेतृत्वाने ग्रीन सिग्नल दिला. तर भाजप उमेदवारीची आस असलेल्या प्रमोद घरडे यांनी अपक्ष म्हणून मैदानात उडी घेतली आहे.
या मतदारसंघात यावेळी बसपाने भीमराव सूर्यभान गजभिये तर वंचित बहुजन आघाडीने सपना मेश्राम या नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. मनसेने शेखर ढुंडे यांना मैदानात उतरविले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे संजय बोरकर, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) बंडखोर विलास झोडापे यांच्यासह पाच अपक्ष रिंगणात आहेत.
टीम मुळक कुणासोबत?
लोकसभेत राजू पारवे यांच्या पराभवासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी उमरेडमध्ये तळ ठोकला होता. यावेळी बंडाचा झेंडा हाती घेत मुळक स्वतः रामटेकमध्ये बॅटिंग करायला निघाले आहेत.
उमरेडमध्ये केदार गट जि.प.चे जि.प. सभापती मिलिंद सुटे, माजी नगरसेविका दर्शनी धवड यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होता. पक्षाचा आदेश पाळत त्यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतली. त्यामुळे लोकसभेत बर्वे यांच्यासाठी मैदानात किती ताकद देते, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार असलेली टीम काँग्रेस संजय मेश्राम यांना आहे.
आधी काय झाले आणि आता काय?
लोकसभा निवडणूक तोंडावर असताना माजी मंत्री सुनील केदार यांच्याकडून संजय मेश्राम यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन होत असल्याने राजू पारवे नाराज होते. आता राजू पारवे भाजपमध्ये आहेत तर मेश्राम काँग्रेसचे उमेदवार आहेत.
२०१९ मध्ये उमरेडमध्ये मतदारांनी काँग्रेसच्या राजू पारवे यांना डोक्यावर घेतले होते. पारवे यांनी तब्बल ९१,९६८ मते घेत भाजपचे सुधीर पारवे यांचा १८ हजार २९ मतांनी पराभव केला होता. सुधीर पारवे यांना ७३,९३९ मते मिळाली होती.
बसपाचा हत्ती किती धावणार?
२०१४ मध्ये मोदी लाटेत बसपाचे वृक्षदास बन्सोड यांनी ३४,०७७ मते घेत उमरेडमध्ये काँग्रेसला मागे टाकले होते. २०१९ मध्ये बसपाने संदीप मेश्राम यांना संधी दिली होती. त्यावेळी त्यांना १८,५६७ मिळाली होती.