लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : बऱ्याच दिवसांनंतर आता कुठे कोरोनाबाधितांची आकडेवारी घसरत आहे. काही दिवसांपासून मृत्युसंख्येतही घट होताना दिसते. कोरोनाबाधितांची आकडेवारी जरी कमी येत असली तरी उमरेडकर मात्र पुन्हा मोकाट झाल्यासारखेच सुटले आहेत. नियमावलीचा भंग करणारी बाजारपेठेतील गर्दी बघून पुन्हा कोरोनाला आमंत्रण देण्याचाच प्रकार सुरू असल्याच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत.
सकाळी ७ ते ११ असा अत्यावश्यक सेवा स्वरूपातील दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीने घेतला. आठवड्यातून शनिवार, रविवार आणि सोमवार हे सलग तीन दिवस वैद्यकीय सेवेव्यतिरिक्त संपूर्ण बाजारपेठ बंदच्या निर्णयाचा यात समावेश आहे. सलग तीन दिवस बाजारपेठ बंद ठेवल्यानंतर मंगळवार, बुधवार गर्दीला पारावार राहत नाही. मग शनिवारपासून पुन्हा तीन दिवस बंद राहणार या विचारचक्रामुळे गुरुवारी आणि शुक्रवारी बाजारपेठेत चांगलीच गर्दी उसळते.
वारंवार दुकाने सुरू-बंदच्या निर्णयामुळे नागरिकसुद्धा चांगलेच संतापले आहेत. ऐनवेळी निर्णय बदलविला जातो, अशाही चर्चा नागरिकांमध्ये दिसून येत आहेत. शिवाय, काही दुकानांची अर्धवट शटर उघडून खुलेआम सुरू असलेली ‘दुकानदारी’ यामुळेही गर्दी वाढण्यास कारणीभूत मानली जाते. शासकीय यंत्रणेचे या संपूर्ण प्रकाराकडे दुर्लक्ष होत असून, अगदी माेक्याच्या क्षणाला यंत्रणा कुचकामी का ठरत आहे, असा सवाल नागरिक विचारत आहेत. नागरिकांनी मास्क आणि ठरावीक अंतराच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केले जात आहे.
....
आठवडाभर ७ ते ११ का नाही?
आठवड्यातून तीन दिवस दुकाने, प्रतिष्ठाने बंद ठेवल्यानेच गर्दीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. आठवडाभर सकाळी ७ ते ११ अशी वेळ निश्चित केल्यास आणि यंत्रणेने लक्ष दिल्यास नक्कीच यात सुधारणा घडून येईल, असे बोलले जात आहे. बुधवार वगळता अन्य दिवस दुकाने प्रतिष्ठाने सुरू ठेवावी. शिवाय, वेळेतसुद्धा बदल करावा, अशी मागणी व्यक्त होत आहे.