लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : घरची परिस्थिती बेताचीच. वडिलांचे छोटेसे किराणा दुकान. असंख्य काैटुंबिक अडथळे असले तरीही आपल्याला राष्ट्रीय पातळीवरील ‘अडथळ्यांची दौड’ जिद्दीने आणि परिश्रमाने पार करायचीच आहे, असा चंग त्याने बांधला. सतत तीन वर्षे घाम गाळला आणि ज्युनिअर राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत चक्क रौप्य पदक खेचून आणले.
उमरेड येथील संदीप विनोद गोंड असे या १५ वर्षीय खेळाडूचे नाव असून, १६ वर्षाआतील मुलांच्या ८० मीटर हर्डल्स शर्यतीमध्ये (अडथळा दौड) त्याने ही कामगिरी केली आहे. या स्पर्धा ६ ते १० फेब्रुवारीदरम्यान गुवाहाटी येथे पार पडल्या. मूळचा उमरेड येथील संदीप नागपूरच्या भारतीय कृषी विद्यालयात इयत्ता दहावीत शिक्षण घेत आहे. मागील वर्षापासून क्रीडा प्रबोधिनीच्या निवासी वसतिगृहात त्याची निवड झाली. तत्पूर्वी संदीपने उमरेड येथे ओम साई स्पाेर्टिंग क्लबच्या माध्यमातून संपूर्ण प्रशिक्षण घेतले. पहाटे अडीच तास तर सायंकाळी दोन तास घाम गाळत त्याने मेहनतीच्या बळावर हे यश गाठले. त्याच्या यशात ओम साई स्पाेर्टिंग क्लबचे रितेश राऊत, पवन मडावी, मंगेश ठवरे, प्रफुल्ल बेले, गजानन ठाकरे, सौरभ राऊत, आकाश बनकर आदींचा सहभाग असल्याचे तो आवर्जून सांगतो. अजून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेचा बराच पल्ला गाठायचा असल्याच्या प्रतिक्रिया संदीपने व्यक्त केल्या.