लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तालुक्यातील उमठा हे गाव दारू विक्रीसाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. त्यामुळे इतर गावातील नागरिकांचा या गावाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही वेगळा होता. त्यातच यावर्षी पाणी फाऊंडेशनच्यावतीने घेण्यात येणाऱ्या वॉटर कपसाठी नरखेड तालुक्याची निवड करण्यात आली. त्यात उमठावासीयांनी हिरीरीने भाग घेतला आणि नियोजित काळात जलसंवर्धनासाठी भरीव कामगिरी केली. या कार्याला गावातील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी हातभार लावल्याने उमठावासीयांनी वॉटर कपमध्ये राज्यात तिसरा क्रमांक पटकावला. त्यामुळे या गावाला पाणी फाऊंडेशनच्यावतीने २० लाख रुपये आणि राज्य शासनाच्यावतीने १० लाख रुपयांचे बक्षीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.उमठा गावाची लोकसंख्या ही ७२१ आहे. वॉटर कपमध्ये सहभागी झाल्याच्या पहिल्या दिवसापासून गावातील प्रत्येकाने रखरखत्या उन्हात श्रमदान करीत एकाच नाल्यावर तब्बल ८० बंधारे बांधण्याचा विक्रम केला. ग्रामस्थांच्या या कार्याची दखल घेत तल्कालीन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी कादंबरी बलकवडे यांनी गावाला वेळोवेळी भेटी देत मार्गदर्शन केले.
विद्यमान जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनीही मदत केली.महाश्रमदानाच्या दिवशी मराठी सिने अभिनेता जितेंद्र जोशी यांनी स्वत: उमठा येथे येऊन श्रमदान केले. पाणी फाऊंडेशनचे सीईओ सत्यजित भटकर यांनीही गावाची व ग्रामस्थांनी केलेल्या कामाची पाहणी केली. अंतिम पाहणीसाठी पोपटराव पवार यांच्या मुलीसुद्धा उमठा येथे आल्या होत्या. माजी मंत्री अनिल देशमुख, त्यांच्या पत्नी आरती देशमुख यांच्यासह मान्यवरांनी येथे वेळावेळी श्रमदान केले. परिणामी, उमठावासीयांनी वॉटर कपमध्ये राज्यात तिसरा क्रमांक पटकावला. पुणे येथे पार पडलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २० लाख रुपयांचे रोख बक्षीस व मानचिन्ह उमठावासीयांना प्रदान केले. शिवाय, राज्य शासनाच्यावतीने १० लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाला राज्यमंत्री विजय शिवतारे, अभिनेता आमीर खान, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.