नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ७ कोटी ५२ लाख रुपये खर्चून ई-लायब्ररीचे बांधकाम झाले. परंतु दुसऱ्या टप्प्यातील साधारण ८ कोटीच्या निधीला प्रशासकीय मंजुरीच मिळाली नाही. यामुळे फर्निचर व संगणकीकरणाच्या अभावी ‘ई’ नसलेली लायब्ररी सुरू आहे. विशेष म्हणजे १६ जानेवारी रोजी या लायब्ररीचे उद्घाटन तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्यांनी तत्काळ निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र नऊ महिने होऊनही राज्यातील पहिल्या ई-लायब्ररीसाठी मेडिकलला निधीची प्रतीक्षा आहे. वैद्यकीय क्षेत्रातील जाडजूड पुस्तकांना फाटा देऊन संगणकाच्या पडद्यावर वैद्यकीय विश्व उभे करण्यासाठी ई-लायब्ररीच्या बांधकामाला मंजुरी मिळाली. या लायब्ररीमुळे मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे युजी व पीजीच्या विद्यार्थ्यांना आणि वैद्यकीय शिक्षकांना संशोधनाकरिता विविध विषयातील ‘ई-जर्नल्स’ तातडीने उपलब्ध होणार होते, परंतु संगणक व्यवस्था आणि त्याला लागणाऱ्या फर्निचरसाठी लागणाऱ्या निधीला शासकीय मंजुरीच मिळाली नाही. विशेष म्हणजे, मेडिकल प्रशासनाने या संबंधी प्रस्ताव पाठवून आठ महिन्यांच्यावर कालावधी झालेला आहे. ४१०६.७४३ चौ. मी. मध्ये पसरलेल्या या एक मजली ई-लायब्ररीमध्ये पुस्तकांच्या ऐवजी संगणक राहणार होते. या संगणकांना उपग्रहाशी जोडण्यात येणार होते. एकाच वेळी साधारण २०० विद्यार्थी या ई-लायब्ररीचा लाभ घेऊ शकणार होते. राज्यात अशा प्रकारच्या लायब्ररी इतरही मोठ्या शहरांमध्ये भविष्यात तयार करून त्या सर्व एकमेकांशी जोडण्यात येणार होत्या. संपूर्ण डिजीटल असणाऱ्या या लायब्ररीत जगात कुठेही वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित व्याख्यान, कार्यक्रम सुरू असेल अथवा डाटा असेल तर त्याला या लायब्ररीला जोडून येथे बघता येणार होते. या शिवाय व्हिडीयो कॉन्फरन्सिंगची सोय राहणार होती. परंतु संगणकच नसल्याने या सर्व आवश्यक गोष्टींवर पाणी फेरले आहे. या लायब्ररीच्या उद्घाटनाच्यावेळी खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन दिले होते, मात्र याला आता नऊ महिने झाले आहेत, परंतु अद्यापही निधी उपलब्ध झालेला नाही. (प्रतिनिधी)
संगणक नसलेली ‘ई लायब्ररी’
By admin | Published: October 25, 2014 2:41 AM