फ्लाईंग क्लबमधील चारही विमाने उड्डाणास असक्षम : हायकोर्टात माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 12:48 AM2019-11-30T00:48:29+5:302019-11-30T00:49:31+5:30
सध्याच्या परिस्थितीत नागपूर फ्लाईंग क्लबमधील चारही विमाने उड्डाण भरण्यास असक्षम असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली आहे. विभागीय आयुक्त फ्लाईंग क्लबचे अध्यक्ष असून त्यांनी फ्लाईंग क्लबच्या सद्यस्थितीसंदर्भात न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सध्याच्या परिस्थितीत नागपूर फ्लाईंग क्लबमधील चारही विमाने उड्डाण भरण्यास असक्षम असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली आहे. विभागीय आयुक्त फ्लाईंग क्लबचे अध्यक्ष असून त्यांनी फ्लाईंग क्लबच्या सद्यस्थितीसंदर्भात न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
प्रतिज्ञापत्रातील अन्य माहितीनुसार, चारपैकी तीन विमानांमध्ये ‘सेसना-१५२’ मॉडेलचे इंजिन लागले होते. ते तिन्ही इंजिन आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी अमेरिकेतील लायकमिंग कंपनीकडे पाठविण्यात आली आहेत. सुधारित इंजिन २८ फेब्रुवारी २०२० पर्यंत मिळणार आहेत. तसेच, चौथ्या विमानात २०१७ मध्ये ‘सेसना-१७२’ इंजिन बसविण्यात आले होते. परंतु, या विमानाने गेल्या दोन वर्षापासून उड्डाण भरले नाही. त्यामुळे त्या इंजिनचीही तपासणी करणे गरजेचे आहे. ही चारही विमाने उड्डाणक्षम करण्यासाठी मेन्टेनन्स मॅनेजरला पाच महिन्याचा वेळ देण्यात आला आहे.
कॅप्टन शिवकुमार जयस्वाल यांची चिफ फ्लाईंग इन्स्ट्रक्टरपदी नियुक्ती करण्याचा वाद अद्याप संपला नाही. क्लबमधील विमाने उड्डाणक्षम होतपर्यंत त्यांच्या नियुक्तीची गरज नाही असे न्यायालयाला सांगण्यात आले आहे. फ्लाईंग क्लब चांगल्या पद्धतीने संचालित करण्यासाठी चिफ फ्लाईट इन्ट्रक्टर, असिस्टंट फ्लाईट इन्ट्रक्टर, मेन्टेनन्स मॅनेजर, क्वॉलिटी मॅनेजर, कन्टीन्युइंग एयरवर्थिनेस मॅनेजर, सेफ्टी मॅनेजर, टेक्निकल ऑफिसर, स्टोअर किपर, चार टेक्निशियन, चिफ ग्राऊंड इन्स्ट्रक्टर व ग्राऊंड इन्स्ट्रक्टर या कर्मचाऱ्यांची गरज असून सध्या चिफ फ्लाईट इन्ट्रक्टर, दोन टेक्निशियन, चिफ ग्राऊंड इन्स्ट्रक्टर व ग्राऊंड इन्स्ट्रक्टर ही पदे रिक्त आहेत. त्यातील दोन टेक्निशियनची नियुक्ती लवकरच केली जाणार आहे. तसेच, फ्लाईंग क्लबमधील विविध दुरुस्तीची कामे २८ फेब्रुवारी २०२० पर्यंत पूर्ण केली जातील अशी ग्वाही विभागीय आयुक्तांनी दिली आहे.
प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेतले
यासंदर्भात सुमेधा घटाटे यांची जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने विभागीय आयुक्तांचे प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेऊन पुढील मुद्दे विचारात घेण्याकरिता प्रकरणावरील सुनावणी चार आठवडे तहकूब केली. याचिकाकर्तीतर्फे अॅड. श्रीनिवास देशपांडे यांनी कामकाज पाहिले.