लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुख्यात संतोष आंबेडकरच्या इतवारी येथील अनधिकृत बहुमजली इमारतीवर अखेर बुलडोजर चालवण्यात आला. पोलीस आणि महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथक यांनी संयुक्तपणे बुधवारी कारवाई करीत ही अनधिकृत इमारत जमिनदोस्त केली.कुख्यात संतोष आंबेकरविरुद्ध फसवणूक, रेप आणि खंडणी वसुलीसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की, आंबेकरविरुद्ध याप्रकारचे आणखीही काही प्रकरण हळूहळू पुढे येत आहेत. पहिल्यांदाच अशा प्रकारची कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जाते. तपासादरम्यान असे आढळून आले होते की, संतोष आंबेकरची इतवारी शाळेजवळ असलेली बहुमजली इमारत अनधिकृत आहे.मनपाच्या महाल झोन अंतर्गत दारोडकर चौक इतवारी शाळेजवळ (घर क्रमांक ४४३) ‘आठवण’ या नावाची अनधिकृत बहुमजली इमारत आहे. ही इमारत पाडण्यासाठी बुधवारी पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तात मनपाचे अतिक्रमण विरोधी पथक इतवारीत पोहोचले. चार माळ्याच्या या इमारतीत काही भाडेकरूही राहत होते. तळ मजला आणि चौथ्या माळ्यावरचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. इमारतीत भाड्याने दिलेल्या कपड्याच्या दुकानाचे शटर व भिंतीही तोडण्यात आल्या. उपरोक्त बांधकाम हे मनपाच्या मंजुरीविरुद्ध असून तळमजल्याचे ५५.२८ चौ.मी., पहिल्या मजल्याचे ५५.२९ चौ. मी., दुसऱ्या मजल्याचे ५५.२९ चौ. मी., तिसºया मजल्याचे ५५.२९ व चौथ्या मजल्याचे संपूर्ण ९३.९१ चौ. मीटर अनधिकृत बांधकाम होते. इमारतीच्या बांधकामासाठी प्रशासनाकडून कुठलीही मंजुरी घेण्यात आलेली नव्हती. बहुमजली इमारतीचा नकाशाही मंजूर नव्हता. अनधिकृत पद्धतीने इमारत बांधण्यात आली. या प्रकरणात सर्व प्रक्रिया पूर्ण करीत इमारत पाडण्यात आली. या कारवाईतून पोलिसांनी अवैध संपत्तीतून अशा प्रकारची संपत्ती उभी करणाऱ्यांनाही एक स्पष्ट संदेश दिलेला आहे. गेल्या १३ नोव्हेंबर रोजी कलम ३ झेड(१) अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार कारवाई सुरु करण्यात आली. यावेळी लागूनच असलेल्या अण्णाजी मोझरकरचेही अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले.ही कारवाई लकडगंजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनय चौधरी, झानचे अभियंता पुंडलिक ढोरे, अतिक्रमण विरोधी पथकाचे सहायक आयुक्त अशोक पाटील, संजय कांबळे, नितीन मंथनवार, भास्कर माळवे, शादाब खान, विशाल ढोले यांनी केली.
उपराजधानीतील कुख्यात आंबेकरची अनधिकृत इमारत पाडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2019 10:43 AM
कुख्यात संतोष आंबेडकरच्या इतवारी येथील अनधिकृत बहुमजली इमारतीवर अखेर बुलडोजर चालवण्यात आला.
ठळक मुद्देइतवारी येथे पोलीस व मनपा अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई