लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कृषी विभागाच्या गुणवत्ता मिशन नियंत्रण कार्यक्रमांतर्गत भरारी पथकांनी केलेल्या कारवाईमध्ये नागपूर विभागात २२ विक्रेत्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. जून महिन्याच्या पहिल्या आठवडाअखेरपर्यंत झालेल्या कारवायांमध्ये ७५ लाख एक हजार रुपयांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त करण्यात आले आहे. विक्रेत्यांवरील सर्वाधिक कारवाया नागपूर जिल्ह्यात आहेत.नागपूर विभागातील चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि नागपूर या चार जिल्ह्यात अनधिकृत कापूस बियाणे विक्रेत्यांवर मागील महिनाभरात कारवाया करण्यात आल्या. भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात कापसाचे पीक होत नसल्याने या दोन्ही जिल्ह्यात कारवाया नाही. अनधिकृत कापूस बियाणे विके्रत्यांवर नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक १२ गुन्हे दाखल आहेत. त्यापाठोपाठ चंद्रपूर जिल्ह्यात सहा, गडचिरोली जिल्ह्यात तीन तर वर्धा जिल्ह्यात फक्त एका गुन्ह्याची नोंद आहे. या सर्व ठिकाणांहून अनधिकृत बियाण्यांचे ८ हजार ९६७ पॉकेट आणि २८३ खुले बियाणे जप्त करण्यात आले आहे.कापूस बियाणेसंदर्भात जिल्हा अणि तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. जिल्हास्तरावर कृषी विकास अधिकारी, तसेच तालुका व पंचायत समितीस्तरावर तालुका कृषी अधिकारी यांच्याअंतर्गत ही मोहीम १५ मेपासून राबविणे सुरू झाले असून, १५ आॅगस्टपर्यंत चालणार आहे.शेतकऱ्यांना योग्य दर्जाच्या कृषी निविष्ठा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विभाग तसेच जिल्हास्तरावर आणि तालुकास्तरावर भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत गुणवत्ता मिशन नियंत्रण-२०२० कार्यक्रम राबविला जात आहे. या पथकांमार्फत बियाणे, खते व कीटकनाशकांचे नमुने काढण्याचे वर्गीकरण केले जात आहे. प्रत्येक तालुक्यात मिळून १३ तालुका तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविली जात आहे.जिल्ह्यात १३५६ विक्रेतेनागपूर जिल्ह्यात बियाण्यांचे १ हजार ३५६ विक्रेते आहेत. रासायनिक खतांचे १ हजार ४५४ विक्रेते असून, कीटकनाशकांचे १ हजार २६६ विक्रेते आहेत. जिल्ह्यात पूर्णवेळ गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक २, अर्धवेळ गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक (राज्यस्तर) २३, अर्धवेळ निरीक्षक (जिल्हा परिषद स्तर) १६, असे एकूण ४१ गुणनियंत्रक कार्यरत आहेत.
नागपूर विभागात ७५ लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 9:04 PM