नागपूर: राज्यातील महामार्ग आणि द्रुतगती महामार्गांवर वाहन अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘आरटीओ’च्या वायुवेग पथकांमध्ये १८७ ‘इंटरसेप्टर वाहन’ वाढविण्याला मंजुरी मिळाली आहे. यातील ८ वाहने नागपूरच्या आरटीओ कार्यालयांना उपलब्ध होणार आहेत. यात ‘लेझर बेस्ड स्पीड गन विथ लेसर कॅमेरा’ असल्याने बेलगाम धावणाºया वाहनांना लगाम लागण्याची शक्यता आहे.
राज्यातील सर्वच प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) वायुवेग पथकाचा ताफ्यात २०२१ मध्ये १३.६८ कोटी खर्चून ७६ नवी वाहने आली होती. आता ३८ कोटी ३३ लाख रुपये खर्चून १८७ ‘इंटरसेप्टर’ वाहनांची भर पडणार आहे. यामध्ये एका वाहनावर सुमारे २० लाख ५० रुपये खर्च केला जाणार आहे. नागपूरच्या ग्रामणी आरटीओ कार्यालयाला ५, शहर आरटीओ कार्यालयाला २ तर पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला १ असे एकूण ८ वाहने उपलब्ध होणार आहेत. येत्या मार्चपर्यंत ‘इंटरसेप्टर’ वाहने परिवहन विभागाकडे येतील. त्याची आवश्यक ती चाचणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ताफ्यात समावेश होण्याची शक्यता आहे.
वेग वाढवताच कॅमेऱ्यामध्ये कैद ‘इंटरसेप्टर’ वाहनांमध्ये ‘लेझर बेस्ड स्पीड गन विथ लेसर कॅमेरा’ बसविण्यात येणार आहे. यामुळे किती वेगात वाहन असलेतरी वाहनाचा वेग व नंबर प्लेटचा फोटो कॅमेºयात कै द होणार आहे. सोबतच या वाहनांमध्ये ‘अल्कोहल ब्रेथ अॅनालायझर’सुद्धा असणार आहे. यामुळे मद्यपी वाहनचालकांविरुद्ध 'ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह' कारवाईला गती येणार आहे. विशेष म्हणजे, याचा प्रिंटेड अहवाल आणि छायाचित्रही मिळणार आहे. सोबतच गुळगुळीत झालेल्या टायरवर कारवाई करण्यासाठी आवश्यक उपकरणासह काळी काच मोजणारी ‘टिंट मीटर’ही असणार आहे.