लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २२ फेब्रुवारीला रेशीमबाग मैदानात आयोजित भीम आर्मीच्या सभेला पोलिसांकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. ती मिळणार की नाही, याबाबत अनिश्चितता आहे.सीएए, एनआरसी, एनपीआरच्या विरोधात भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. २२ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजता रेशीमबाग मैदानावर ही सभा करण्याचे ठरले आहे. त्यासंबंधाने स्थानिक मंडळींनी जोरदार प्रचार केला असून, कोतवाली पोलिसांकडे सभेची परवानगीही मागितली आहे. मात्र, सध्याची कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती लक्षात घेता या सभेला परवानगी द्यावी की नको, अशा द्विधा मनस्थितीत पोलीस प्रशासन आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबई पोलिसांनी सोमवारी तेथील सभेला परवानगी नाकारल्याचे वृत्त आले आहे. त्यामुळे नागपुरातील सभेला परवानगी मिळण्याची शक्यता आता मावळली आहे. यासंबंधाने कोतवाली पोलिसांनी भीम आर्मीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना सोमवारी रात्री चर्चेसाठी बोलवून घेतले आहे. त्यात परवानगी देण्याचा अथवा नाकारण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
नागपुरात भीम आर्मीच्या सभेबद्दल अनिश्चितता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 11:48 PM