अशोक मेश्राम पंचशील वाचनालयाजवळ राहत होता. तो एका चिकनच्या दुकानात काम करायचा आणि त्याला दारूचे भारी व्यसन होते. त्यामुळे पत्नी दोन वर्षांपूर्वीच त्याला सोडून गेली होती. घराचे बांधकाम सुरू असल्याने पुतण्या सारंगसोबत वाद सुरू होता. गुरुवारी सकाळी बांधकाम सुरू होताच सारंगने जागेचा वाद उकरून काढला आणि बांधकामास मनाई केली. यावेळी अशोकने पुतण्याला शिवीगाळ करून त्याचा विरोध मोडून काढला. त्याची खुन्नस मनात ठेवून सारंग दिवसभर संधी शोधत होता. मध्यरात्री दारूच्या नशेत सारंग लाकडी दांडा घेऊन अशोकच्या घरात शिरला आणि अर्धवट झोपेत असलेल्या अशोकच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने फटके हाणून हत्या केली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती कळताच पाचपावपलीचे ठाणेदार किशोर नगराळे, पोलीस उपायुक्त लोहित मतानी ताफ्यासह तिकडे धावले. त्यांनी आरोपी सारंगला अटक केली.
जिवाच्या भीतीने केली हत्या
रोजमजुरी करणाऱ्या सारंगला पोलिसांनी हत्येचे कारण विचारले असता, त्याने जिवाच्या भीतीने काकाची हत्या केल्याचे सांगितले. अशोक मेश्राम काहीसा गुन्हेगारी वृत्तीचा होता. २०१२ मध्ये त्याने त्याचा भाऊ आणि सारंगचे वडील युवराज मेश्राम यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला होता. गुरुवारी सकाळी वाद झाल्यानंतर अशोकने सारंगला धमकी दिली होती. त्यामुळे तो आपल्या जिवाला धोका पोहचवेल, ही भीती वाटल्याने त्याची हत्या केल्याचे सारंगने पोलिसांना सांगितले आहे.
अल्पवयीन मुलावर प्राणघातक हल्ला
कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुलमोहरनगरात राहणारा हर्षल धुंदराज कनोजे (१६) हा आपल्या मित्रासह गुरुवारी सकाळी कामावर जात असताना, १०.३० च्या सुमारास आरोपी कृष्णा बलदेव शाहू (५५) याने हर्षलला अश्लील शिवीगाळ केली. विरोध केला असता आरोपीने विळ्याने मारून हर्षललागंभीर जखमी केले. आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावली. त्यांनी हर्षलला आरोपी शाहूच्या तावडीतून सोडवले. हर्षलने दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
ऑटोरिक्षाचालकावर खुनी हल्ला
नागपूर - पारडीतील ऑटोचालकांमध्ये सुरू असलेल्या वादाचे पर्यावसान एकावरील प्राणघातक हल्ल्यात झाले. जितू नामक ऑटोरिक्षाचालकावर चाकूचे घाव घालून दुसऱ्या ऑटोरिक्षाचालकाने त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास ही घटना घडली. गंभीर जखमी झालेल्या जितूला मेयोत पोहचविण्यात आले. पोलिसांकडून आरोपी शोधण्याचे काम सुरू आहे.