लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल : वडिलाेपार्जित शेताचा धुरा आणि ताराच्या कुंपणाचा वाद विकाेपास केला आणि पुतण्यांनी काकासाेबत भांडायला सुरुवात केली. त्यातच दाेन्ही पुतण्यांनी काकाच्या डाेक्यावर कुऱ्हाड व काठीने वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या काकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शिवाय, आराेपी सख्खे भाऊ असून, पाेलिसांनी त्यांना अटक केली. ही घटना काटाेल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पारडसिंगा नजीकच्या येरंडा शिवारात गुरुवारी (दि. १७) दुपारी १.१५ वाजताच्या सुमारास घडली.
अशोक बाबुराव गाढवे (४०) असे मृताचे तर गाेपाल मधुकर गाढवे (२९) व प्रफुल्ल मधुकर गाढवे (२७) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. हे सर्व जण पारडसिंगा, ता. काटाेल येथील रहिवासी असून, त्यांची वडिलाेपार्जित शेती येरंडा शिवारात आहे. अशाेक हे गाेपाल व प्रफुल्लचे काका हाेत. त्यांची शेती जवळजवळ असून, त्यांच्यात मागील काही दिवसांपासून शेताच्या धुऱ्यावरून वाद हाेता.
त्यातच काही दिवसांपूर्वी शेताला तारांचे कुंपण घालण्यात आल्याने हा वाद पुन्हा विकाेपास केला. अशाेक, गाेपाल व प्रफुल्ल गुरुवारी दुपारी शेतात असताना त्यांच्यात भांडणाला सुरुवात झाली. या दाेघांनीही अशाेक व त्यांचा मुलगा हर्षल (१८) यांना मारहाण करायला सुरुवात केली. एवढेच नव्हे तर त्यांनी कुऱ्हाड व काठीने अशाेक यांच्या डाेक्यावर वार केले. यात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने काटाेल येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर नागपूर येथील लता मंगेशकर हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. पुढे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी हर्षल गाढवे याच्या तक्रारीवरून भादंवि ३०२, ५०४, ५०६, २४ अन्वये गुन्हा दाखल करून दाेन्ही आराेपीस अटक केली. या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक आकाशा शाही करीत आहेत.