लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशोक मेश्राम (वय ५५) नामक व्यक्तीची त्याच्या पुतण्याने लाकडी दांडक्याने मारून हत्या केली. बांधकामाच्या वादातून ही घटना घडल्याचे समजते. सारंग युवराज मेश्राम (वय ३३) असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. मेश्राम पंचशील वाचनालयाजवळ राहत होता. तो एका चिकनच्या दुकानात काम करायचा आणि त्याला दारूचे भारी व्यसन होते. त्यामुळे पत्नी दोन वर्षांपूर्वीच त्याला सोडून गेली होती. त्यांच्या घराचे बांधकाम सुरू होते. त्यासंबंधाने त्यांचा पुतण्या सारंगसोबत वाद सुरू होता. गुरूवारी सकाळी बांधकाम सुरू होताच सारंगने जागेचा वाद उकरून काढला आणि बांधकामास मनाई केली. यावेळी मेश्रामने आपल्या पुतण्याला शिवीगाळ करून त्याचा विरोध मोडून काढला. त्याची खुन्नस मनात ठेवून आरोपी पुतण्या दिवसभर मेश्राम यांची हत्या करण्याची संधी शोधत होता. मध्यरात्री दारूच्या नशेत टून्न होऊन आरोपी सारंग लाकडी दांडा घेऊन मेश्राम यांच्या घरात शिरला आणि अर्धवट झोपेत असलेल्या मेश्राम यांच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने फटके हाणून त्यांची हत्या केली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती कळताच पाचपावपलीचे ठाणेदार किशोर नगराळे, पोलीस उपायुक्त लोहित मतानी आपल्या ताफ्यासह तिकडे धावले. त्यांनी आरोपी सारंगला अटक केली.
जीवाच्या भीतीने केली हत्या
सारंगला पोलिसांनी हत्येचे कारण विचारले असता त्याने जीवाच्या धाकाने काकाची हत्या केल्याचे सांगितले. सारंग रोजमजुरी करतो. अशोक मेश्राम काहीसा गुन्हेगारी वृत्तीचा होता. २०१२ मध्ये त्याने त्याचा भाऊ आणि सारंगचे वडील युवराज मेश्राम यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला होता. गुरुवारी सकाळी वाद झाल्यानंतर अशोक मेश्रामने सारंगला धमकी दिली होती. त्यामुळे तो आपल्या जीवाला धोका पोहचवेल ही भीती वाटल्याने त्याची हत्या केल्याचे सारंगने पोलिसांना सांगितले आहे.