नागपूर : कौटुंबिक कलहातून मामाने आपल्या भाच्यालाच संपविल्याची घटना शुक्रवारी रात्री १२ वाजता गड्डीगोदाम मशीदजवळ घडली. अतुल प्रकाश उके (४२) असे मृत भाच्याचे नाव आहे, तर दिनेश भगवान लोखंडे (४९) असे आरोपी मामाचे नाव आहे. या खुनामुळे परिसरात वेगवेगळी चर्चा करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अतुल आरोपी दिनेशच्या मोठ्या बहिणीचा मुलगा आहे. दिनेशच्या पत्नीचे अतुलच्या घराला लागूनच माहेर आहे. दिनेश आपल्या पत्नीवर शंका घेत होता. त्यामुळे त्याचा पत्नीसोबत वाद सुरू आहे.
काही वर्षांपासून दिनेश आणि त्याची पत्नी वेगळे राहत आहेत. त्याची पत्नी मुलगा शुभम आणि मुलीसोबत अतुलच्या घराजवळ राहतात. दिनेशचा मुलगा आणि अतुल मित्र असल्याचे बोलले जाते. शुक्रवारी रात्री ८ वाजता दिनेशने पत्नीच्या घरी जाऊन वाद घातला. मुलगा घरी आल्यानंतर त्याच्या आईने दिनेशने घरी येऊन वाद घातल्याचे सांगितले. त्यामुळे दिनेशचा मुलगा शुभम आणि अतुलने दिनेशच्या घरी जाऊन शिवीगाळ केली. त्याला धमकी देऊन दरवाजावर लाथ मारून निघून गेले. दरम्यान, दिनेशला त्याच्या घराबाहेर अतुल आणि शुभमचे आणखी काही साथीदार असल्याची शंका आली. त्याने आतून दार उघडले नाही. त्यानंतर अतुल गड्डीगोदाम बोगद्याजवळ काही मित्रांसोबत दारू पिऊन मशीदजवळ येऊन थांबला.
दिनेशही अतुलला धडा शिकविण्याच्या तयारीत होता. दिनेशने रात्री १२ वाजता मशीदजवळ अतुलच्या डोक्यावर लोखंडी पाईप मारून त्याला जागीच ठार केले. घटनेची माहिती मिळताच सदरचे ठाणेदार विनोद चौधरी यांनी त्याची दुचाकी ताब्यात घेऊन बसस्टॅण्ड आणि रेल्वेस्टेशनवर कर्मचाऱ्यांना पाळत ठेवण्यास सांगितले. रात्री उशिरा दिनेश गड्डीगोदाममध्येच पोलिसांच्या हाती लागला.
आधीही गंभीर गुन्हे दाखल
आरोपी दिनेशवर खुनासह मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांना दिनेश आपल्या पत्नीवर शंका असल्याची माहिती देत आहे. त्यासाठी पत्नीशी वाद झाल्यावर अतुल आणि त्याचा मुलगा त्याला मारहाण करीत होते. शुक्रवारी रात्रीही अतुल आणि त्याचे साथीदार दिनेशला धमकी देऊन गेले होते.
कडेकोट बंदोबस्तात केले न्यायालयात हजर
पोलिसांना खुनाच्या घटनेनंतर परिस्थिती चिघळण्याची शंका आहे. त्यामुळे पोलीस दक्षता बाळगत आहेत. त्यामुळे आरोपी दिनेशला कडेकोट बंदोबस्तात शनिवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले.