नागपूर : मोकाट कुत्र्यांसंदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राप्त तक्रारींचा निपटारा करण्याच्या कामाला मनपा प्रशासन लागले आहे. दोन दिवसातच व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर अकाउंटवर अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. दुसरीकडे रविवारी मोकाट कुत्र्यांना खाण्यास दिल्यावरून चांगलाच वाद निर्माण झाला. तो वाद वाढल्याने प्रकरण पोलिसांत गेले. पोलिसांनी तीन जणांच्या विरोधात तक्रार दाखल करून घेतली. मात्र या प्रकरणात मनपाकडे कोणतीही तक्रार देण्यात आली नाही.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास मानकापूर जुन्या वस्तीत ही घटना घडली. पोलिसात दाखल तक्रारीनुसार तक्रारदार विकास अलवर (33) हा मोकाट कुत्र्यांना खायला घालत होता. या दरम्यान वस्तीतील मेहर (३३), राहुल कृष्णजी पारसे (३८) व राजेश नागोराव खुशाल दशरथ वंजारी (३८) हे तिघे अलवर यांच्याजवळ आले. त्यांना कुत्र्यांना खाण्यास देण्याला मनाई केली. कुत्र्यांना टाकण्यासाठी आणलेले दूध व खाद्य सामग्री फेकून धक्काबुक्की केली.
मोकाट कुत्र्यांना खाण्याला दिल्याने वस्तीत कुत्र्यांची संख्या वाढत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. लहान मुले व वृद्धांना कुत्र्यापासून धोका निर्माण झाल्याचे सांगितले. यावरून वाद वाढला. यात विकासला धक्काबुक्की करण्यात आली. यासंदर्भात मानकापूर पोलीस स्टेशनला विकास याने तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर विकासला तपासणीसाठी मेयो रुग्णालयात नेण्यात आले.
या दरम्यान राहुल, खुशाल व राजेश यांच्या विरोधात प्राथमिक स्वरूपाची तक्रार दाखल करण्यात आली. मोकाट कुत्र्यांना खाण्याला देणाऱ्यांना २०० रुपये दंडाची तरतूद आहे. तक्रारींचा निपटारा करण्यासाठी झोन स्तरावर डॉग कंट्रोल सेल गठित केला आहे.
कुत्र्यांवर नसबंदी होणार
- नागपूर शहरात मोकाट कुत्र्यांवरील नसबंदी शस्त्रक्रिया बंद असल्याने अशा कुत्र्यांची संख्या लाखाहून अधिक झाली आहे. नसबंदीसाठी १७ कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. न्यायालयानेही हा निधी तातडीने उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहे.
- त्यानुसार मनपाच्या पशुवैद्यकीय विभागाने आठवडाभरात या संदर्भात निविदा काढून नसबंदी प्रक्रिया स्वतःच्या निधीतून राबविण्याचे नियोजन केले आहे. सरकारकडून निधी प्राप्त झाल्यानंतर निधीचे समायोजन केले जाणार आहे.
तासाभरात दोन डझनाहून अधिक तक्रारी
सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून तक्रारींचा ओघ सुरु आहे. दर तासाला २० ते २५ तक्रारी प्राप्त होत असल्याची माहिती डॉग कंट्रोल सेलच्या अधिकायांनी दिली. तक्रारींची झोननिहाय माहिती संकलित करून त्याचा निपटारा केला जाणार आहे.