धामणा (नागपूर) : झाेपेची डुलकी आल्याने चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि वेगात असलेला ट्रक दुभाजक ताेडून राेडलतच्या घरावर आदळला. यात गंभीर जखमी झालेल्या ट्रक चालकाचा मृत्यू झाला असून, घरातील सहा सदस्य थाेडक्यात बचावले. विशेष म्हणजे, यात काही पाहुण्यांचाही समावेश आहे. ही घटना हिंगणा पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील धामणा (ता. नागपूर ग्रामीण) येथे बुधवारी (दि. १५) मध्यरात्री घडली.
हर्षल युवराज पाटील (वय ३५, रा. तामसवाडी, ता. साक्री, जिल्हा धुळे) असे मृत ट्रकचालकाचे नाव आहे. ताे बुधवारी रात्री ट्रक(एमएच-१८/बीझेड-२७८५) मध्ये मिरची घेऊन नागपूरहून जळगाव येथे जात हाेता. धामणा गावाजवळ त्याला झाेपेची डुलकी आली आणि त्याचा ट्रकवरील ताबा सुटला. त्यामुळे वेगात असलेला हा ट्रक आधी दुभाजकावर आदळला आणि नंतर हा ट्रक अंदाजे ४० फूट घासत जाऊन पुलाखाली राेडलगत असलेल्या रमेश महादेव कोल्हे (६३, रा. धामणा, ता. नागपूर ग्रामीण) यांच्या घरावर आदळला.
यात गंभीर दुखापत झाल्याने ट्रकचालक हर्षल पाटील याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर शहरातील शासकीय रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी हिंगणा पाेलिसांनी भादंवि मृत ट्रक चालकाच्या विराेधात भादंवि २७९, ३०४ (अ), ४२७ अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.
घरातील सहा सदस्य सुखरूप
ही घटना घडली, तेव्हा घरात रमेश महादेव कोल्हे (६३), पत्नी लीलाबाई महादेव कोल्हे (६०), आई वच्छला महादेव कोल्हे (९५), पुतण्या जितेंद्र राजेंद्र कोल्हे (२५), वैशाली जितेंद्र कोल्हे (२३), तसेच पाहुणी म्हणून आलेली जयश्री शिंदे (२६, रा. साकोली, जिल्हा भंडारा) असे सहाजण हाेते. हे सर्वजण बचावले.
सर्व्हिस राेडचे काम अपूर्ण
या महामार्गावरील वाडी ते काेंढाळी दरम्यान सर्व्हिस राेडचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामाचे कंत्राट अटलांटा (बालाजी) नामक कंत्राटदार कंपनीला दिले आहेत. तांत्रिक कारणांमुळे या सर्व्हिस राेड अर्धवट आहे. या राेडचे काम पूर्ण झाले असते तर अपघातात घराचे नुकसान झाले नसते. ही नुकसान भरपाई काेण देणार, असा प्रश्नही रमेश काेल्हे यांच्यासह नागरिकांनी उपस्थित केला आहे.