लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०१६ सालापासून ३८ महिन्यांत विजेच्या धक्क्याने नागपूर शहर मंडळांतर्गत ३९ नागरिकांचा बळी गेला. यात दोन मुलांचादेखील समावेश होता. विद्युत निरीक्षकांनुसार यातील २९ अपघातांसाठी महावितरण जबाबदार होते. मरण पावलेल्यांपैकी केवळ पाच जणांच्याच कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळाली आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत महावितरणकडे विचारणा केली होती. २०१६ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत विजेच्या धक्क्यामुळे किती प्राणांतिक अपघात झाले, यात किती व्यक्ती व प्राण्यांचा बळी गेला, यातील किती अपघातांत महावितरण जबाबदार ठरले, मिळालेली नुकसानभरपाई यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ जानेवारी २०१६ ते २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीदरम्यान नागपूर शहर मंडळाअंतर्गत विजेचा धक्का लागून ३९ जणांचा मृत्यू झाला. १ जानेवारी २०१६ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत ११, २०१७-१८ मध्ये ११ तर २०१८-१९ मध्ये १७ जणांचा जीव गेला. यातील पाच जणांना १८ लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळाली.शिवाय ३० प्राण्यांचादेखील मृत्यू झाला व त्यासंदर्भात ११ जनावरांच्या मालकांना ४ लाख ३२ हजारांची नुकसानभरपाई देण्यात आली.