नागपूर: उपचार करण्याच्या नावावर मांत्रिकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना सावनेर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटणसावंगी येथे मंगळवारी (दि. १४) दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. आराेपीचा शाेध सुरू असल्याची माहिती ठाणेदार मारुती मुळूक यांनी दिली.
मनोज मारोतराव कावळे (४५) असे आरोपी मांत्रिकाचे नाव आहे. पाटणसावंगी ता. सावनेर येथील १६ वर्षीय मुलगी आजारी असल्याने तिच्यावर उपचार करण्यासाठी मनाेज नावाच्या मांत्रिकाला बाेलावण्यात आले हेते. ताे मंगळवारी दुपारी तिच्या घरी दाखल हाेताच त्याने घरातील सर्वांना घराबाहेर जाण्याची सूचना केली. त्याने लिंबाला हळद व कुंकू लावून ते तिच्या अंगावरून उतरविले. साेबतच त्याने तिच्यासाेबत लज्जास्पद कृत्य करून त्याबाबत कुणालाही न सांगण्याची सूचना केली. ताे गेल्यानंतर मुलीने हा प्रकार आईवडिलांना सांगितला. तिच्या तक्रारीवरून सावनेर पाेलिसांनी आराेपी मांत्रिकाविरुद्ध ३५४, ३५४ (ड), ५०६, महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम कलम ३, सहकलम ८ अन्वये गुन्हा दाखल करून त्याचा शाेध सुरू केला आहे.