लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आगामी महानगरपालिका निवडणुकांत निष्क्रिय नगरसेवकांचा पत्ता कापण्याची भाजपने तयारी केली असली तरी हेच नगरसेवक आता पक्षासाठी डोकेदुखी बनले आहेत. विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी या नगरसेवकांचादेखील भाजपला आदरसन्मान करावा लागत असून राजकीय ‘पिकनिक’मध्ये बडदास्त ठेवावी लागणार आहे. दरम्यान, रविवारी मध्यरात्री ३३ नगरसेवकांचा एक गट गोव्याकडे रवाना झाला. पक्षातर्फे चार गटांमध्ये नगरसेवकांना ‘सेफ हाऊस’मध्ये पाठविले जाणार आहे.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला अतिआत्मविश्वास नडला होता. त्यामुळे आताच्या निवडणुकीत फटका बसू नये यासाठी नगरसेवकांना विविध पर्यटनस्थळी नेण्यात येणार आहे. अगोदर सर्वांना एकाच ठिकाणी नेण्यात येणार होते. मात्र विमानांचे तिकीट न मिळाल्यामुळे नियोजनात बदल करण्यात आला. त्याअंतर्गत रविवारी रात्री ३३ पुरुष नगरसेवक गोव्याकडे रवाना झाले. गोव्याहून ते महाबळेश्वरलादेखील जातील.
दुसरीकडे महिला नगरसेवकांना उत्तरांचल, जम्मू-काश्मीरला नेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मध्य प्रदेशमधील उज्जैन, गुजरातमधील अहमदाबादच्या सहलीचेदेखील नियोजन करण्यात आले आहे. स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके, बाल्या बोरकर, वर्षा ठाकरे, नीता ठाकरे यांच्या मार्गदर्शनात नगरसेवकांना चार गटांमध्ये विभागण्यात आले आहे. सर्व नगरसेवक ८ डिसेंबर रोजी परत येतील. १० तारखेला मतदान आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी नागपुरातच राहणार आहेत.
राजकीय सहल टाळण्याचे प्रयत्न
दरम्यान, काही महिला नगरसेवकांनी विविध कौटुंबिक कारणे देत राजकीय सहल टाळण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यांना जावेच लागेल, असे सांगण्यात आले. एका नगरसेवकाची हृदय शस्त्रक्रिया झाली असल्याने त्यांनी जाण्यास नकार दिला तर एका नगरसेवकाना न्यूरोलॉजिकल समस्या आहे. त्यांनी जाणे जमणार नसल्याचे पक्षाला कळविले.