लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना नागपूरसारख्या मध्यवर्ती शहराने विविध विचारधारा व त्यातील मतभेद अनुभवले तरीही आमचे ध्येय एकच होते, ते म्हणजे स्वातंत्र्य मिळविणे. या महोत्सवात भारताच्या सर्वसमावेशकतेला मनामनात अधोरेखित करा, असे आवाहन पालकमंत्री नितीन राऊत यांनी केले आहे. गुरुवारी सकाळी संविधान चौक येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) पुढाकाराने आयोजित आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमात देशासाठी शहीद होणाऱ्या वीर जवानांच्या वीरपत्नींचा सत्कार करण्यात आला. यावेळी विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी विमला आर., केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उपमहानिरीक्षक प्रशांत जांभुळकर, सुभाष चंद्र, संतोष मिश्रा, कमांडंट करुणा राय आदींची उपस्थिती होती. संचालन करुणा राय यांनी केले तर सुभाष चंद्र यांनी आभार मानले
शहीद वीरपत्नींचा सत्कार
- यावेळी शहीद नरेश उमराव बडोले, शहीद ईश्वर नागापुरे, देवीदास गुबडे, डी. जी. आडे यांच्या वीरपत्नी प्रमिला नरेश बडोले, अनिता देवी, शांता बाई, रेखा गुबडे यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
- सायकल रॅली दिल्लीकडे रवाना
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त भारताच्या चार दिशेतून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. २ ऑक्टोबर गांधी जयंतीला चारही सायकल रॅली राजघाटावर पोहोचणार आहे. तत्पूर्वी भारत भ्रमणदरम्यान या सायकल रॅलीच्या स्वागतासाठी देशात विविध ठिकाणी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कन्याकुमारी येथून सुरू झालेली सायकल रॅली नागपुरात पोहोचली. यातील ३० सायकलपटूंचे स्वागत पालकमंत्र्यांनी केले तसेच हिरवी झेंडी दाखवून दिल्लीकडे रवाना केले.