लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या काही काळापासून विविध कारणांमुळे विद्यार्थ्यांमधील ताणतणाव वाढीस लागला आहे. विद्यापीठ तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिकतेला समजून घेणारी प्रणाली असणे आवश्यक आहे. हीच गरज पूर्ण करण्यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थी समुपदेशन केंद्र उभारण्यात यावे, अशी सूचना ‘युजीसी’तर्फे (युनिव्हर्सिटी ग्रॅन्ट कमिशन) करण्यात आली आहे.यासंदर्भात ‘युजीसी’तर्फे देशातील सर्व विद्यापीठांना पत्रच पाठविण्यात आले आहे. १६ एप्रिल २०१५ रोजी उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात ‘युजीसी’तर्फे मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली होती. यात विद्यार्थी समुपदेशन केंद्राचादेखील उल्लेख होता. परंतु अनेक विद्यापीठांनी याची अंमलबजावणीच केली नाही. विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे ताणतणाव असतात. अनेकदा त्यांच्या मनातील प्रश्न, भावना बाहेर येत नाही व त्यातूनच लहान गोष्ट गंभीर स्वरुप घेते. यामुळेच विद्यार्थी समुपदेशन केंद्रात या मुद्यांना हाताळण्यात यावे, अशी सूचना ‘युजीसी’तर्फे करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमधील न्यूनगंड, अभ्यासाचा तणाव, भीती, घरापासून दूर राहत असल्यामुळे वाटणारा एकलकोंडेपणा इत्यादीवर या केंद्राच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधणे अपेक्षित आहे. सोबतच विद्यापीठ पातळीवरदेखील समुपदेशन केंद्र स्थापन करून तेथे तज्ज्ञ मानसोपचारतज्ज्ञांची सेवा उपलब्ध करुन देण्याची सूचनादेखील ‘युजीसी’ने केली आहे.
अशी असावी प्रणालीविद्यार्थी समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थी व शैक्षणिक संस्था यांच्यात संवादाचा एक सेतू प्रस्थापित होणे अपेक्षित आहे. येथे असणारे शिक्षक समुपदेशक हे प्रशिक्षित हवेत व महाविद्यालयीन पातळीवर त्यांनी विद्यार्थ्यांच्या पालकत्वाची जबाबदारी निभावली पाहिजे. अभ्यास व करिअरमध्ये चांगली प्रगती करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळोवेळी प्रोत्साहित करणे, त्यांच्या मानसिक गरजा समजून घेणे या बाबी समुपदेशकांकडून अपेक्षित आहेत.