लाेकमत न्यूज नेटवर्क
बडेगाव : सावनेर तालुक्यातील दुर्गम भागात नागलवाडी गाव वसले आहे. या गावातील नागरिक, विद्यार्थी आणि रुग्णांचे हाल बघता येथील बससेवा पूर्ववत सुरू करा, या मागणीसाठी भीम आर्मीने सावनेर एसटी आगाराचे व्यवस्थापक रामटेके यांच्याकडे निवेदन दिले. बससेवा सुरू न केल्यास तीव्र आंदाेलनाचा इशाराही भीम आर्मीने दिला आहे.
काेराेनाची स्थिती नियंत्रणात असतानासुद्धा गावात बससेवा सुरू झालेली नाही. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांना, रुग्णांना विविध समस्यांचा सामना करावा लागताे. ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल नाही तर ऑफलाइनसाठी बस नाही. शिवाय जंगली भाग असल्याने विद्यार्थ्यांना सायकल वा पायी शाळा गाठणे धोक्याचे आहे, हीच समस्या या भागातील रायवाडी, महारकुंड, टेंभूरडोह आणि खर्डूका या गावाची आहे.
त्यामुळे ही बससेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी भीम आर्मीने केली आहे. अन्यथा आंदाेलनाचा इशारा त्यांनी दिला आहे. यासंदर्भात तहसीलदार सतीश मासाळ, खापा पाेलीस स्टेशनचे ठाणेदार अजय मानकर यांनाही निवेदन दिले आहे. यावेळी भीम आर्मीचे तालुकाध्यक्ष मयूर नागदवने, शहर अध्यक्ष स्वप्निल लांबघरे, रंजित गजभिये, गौतम गजभिये, प्रज्वल बागडे आदी उपस्थित होते. प्रवासी तसेच शालेय विद्यार्थ्यांची गैरसाेय पाहता ही बससेवा सुरू करणे गरजेचे असल्याचे नागलवाडी येथील सरपंच गीता उईके, रायवाडीचे प्रल्हाद गाेहणे, टेंभूरडाेहचे दीपक सहारे, खर्डूका येथील शाेभा भरबत यांनी सांगितले.