लाेकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : काेराेना संसर्ग व लाॅकडाॅऊननंतर आता स्थिती पूर्वपदावर येत आहे. रेल्वे प्रशासनाने काही प्रमाणात रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत; परंतु नरखेड स्थानकावर रेल्वे गाड्यांना थांबा नसल्याने शासकीय कर्मचारी, शालेय विद्यार्थी, व्यापारी तसेच प्रवाशांची गैरसाेय हाेत आहे. त्यामुळे नरखेड येथे रेल्वे गाड्यांना पूर्ववत थांबा देण्यात यावा, या मागणीसाठी व्यापारी संघटनेच्या शिष्टमंडळाने स्टेशन मास्तर कुंभारे यांना निवेदन साेपविले.
नरखेड व परिसरातील हजाराे विद्यार्थी, शासकीय कर्मचारी, व्यापारी व प्रवासी नागपूर येथे रेल्वेने प्रवास करतात. काेराेना व लाॅकडाऊननंतर आता काटाेल व पांढुर्णा येथे रेल्वे गाड्यांना थांबे देण्यात आले; परंतु नरखेड येथे काेणत्याही गाडीला थांबा दिलेला नाही. त्यामुळे व्यापारी, नाेकरदार, विद्यार्थी व प्रवाशांना अपडाऊनची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे सर्व रेल्वे गाड्यांना थांबा देण्याची मागणी व्यापारी संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे.
सद्य:स्थितीत काटाेल, पांढुर्णा स्थानकावर रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात आला; परंतु नरखेडला थांब्यापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आराेपही शिष्टमंडळाने निवेदनातून केला आहे. रेल्वे गाड्याचे थांबे पूर्ववत सुरू न केल्यास १ फेब्रुवारीला रेल्वे राेकाे आंदाेलनाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदन देताना शिष्टमंडळात तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ हिरूडकर, उपाध्यक्ष श्याम जाऊळकर, याेगेश मांडवेकर, सुनील नवघरे, अरशद शेख, मुकुंद रावत, पप्पू महंत, संकेत कुऱ्हाडे, नीलेश खंडेलवाल, पंकज महंत, अतुल हिंगे, विजय डफरे आदी उपस्थित हाेते.