- सहकारी तरुणीसह अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जॉब प्लेसमेंट एजन्सीच्या नावावर ठगबाजांची टोळी चालविणाऱ्या युवकाला व त्याच्या सहकारी महिलेला बेलतरोडी पोलिसांनी अटक केली आहे. प्रारंभिक तपासात या टोळीद्वारे अनेक लोकांना फसविण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. अक्षय अशोक अग्रवाल, रचित अपार्टमेंट व हिमांशी भागनानी हे अटकेतील आरोपी आहेत तर त्यांचे साथीदार वायवीएस श्यामसुंदर, चैना चेलवानी व गौरव क्षीरसागर फरार आहेत.
या टोळीचा मुख्य सूत्रधार अक्षय अग्रवाल असून, तो रायपूरचा निवासी आहे. त्याने मनीषनगर येथे क्रेस्ट टेक्नोलाॅजी नावाने कार्यालय सुरू केले. या कार्यालयाच्या माध्यमातून तो सुशिक्षित बेरोजगारांना आपल्या जाळ्यात ओढत होता. त्याने एप्रिल २०१८ मध्ये नोकरी संदर्भातील जाहिरात दिली. या जाहिरातीच्या आधारावर खापरखेडा निवासी निखिल सहारे याच्यासह ७ इंजिनिअर युवक अक्षय अग्रवालच्या संपर्कात आले. अग्रवालने त्यांना पॉवरग्रीड, बीएसएनएल आदी विभागांमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी पीडितांकडून शैक्षणिक कागदपत्रे घेतली. अग्रवाल, हिमांशी व श्यामसुंदर कार्यालय सांभाळत होते. निखिल व त्याच्या सोबत्यांना आरोपींच्या गोष्टीवर विश्वास बसला. त्यामुळे त्यांनी आरोपींना ७ ते १० लाख रुपये दिले. निर्धारित वेळेत नियुक्ती होत नसल्याने पीडित तरुणांनी आरोपींकडे पैसे परत करण्याची मागणी केली. तेव्हा अग्रवालने त्यांना कामकाजाचे प्रशिक्षण देण्याचा बनाव करून आपल्याच कार्यालयात ठेवले. त्या मोबदल्यात त्यांना पगार देण्याचाही भरवसा दिला. मात्र, तीन-चार महिने कार्यालयात टाइमपासच होत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांना अग्रवालच्या कारनाम्यावर संशय निर्माण झाला. त्यामुळे त्यांनी अग्रवालकडे पुन्हा रक्कम परत करण्याची मागणी केली. निखिलने त्याला ९.५० लाख रुपये दिले होते. त्यातील केवळ एक लाख रुपयेच परत मिळाले. उर्वरित रक्कम देण्यास तो टाळाटाळ करू लागला. अखेर पीडित तरुणांनी बेलतरोडी पोलिसांकडे या संदर्भात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून अक्षय अग्रवाल व हिमांशी भागनानीला अटक केली. दोघांनाही १९ डिसेंबरपर्यंत ताब्यात ठेवले आहे. सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, या टोळीचे पीडित अनेक राज्यात आहेत. कोट्यवधींचे घबाड या प्रकरणातून पुढे येण्याची शक्यता आहे. बहुतांश पीडित उच्च शिक्षित आहेत. अक्षय अग्रवाल चार वर्षांपूर्वी नागपुरात आला होता. त्यानंतर तो शर्मा नावाच्या युवकासोबत जॉब प्लेसमेंटची एजन्सी चालवत होता. शर्माच्या विरोधात सोनेगाव ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे शर्मा व अग्रवाल यांची जोडी फुटली. विशेष म्हणजे अग्रवालने आपल्या नातेवाईकांनाही लाखो रुपयांनी फसवले आहे.
* राजकारणी नेत्यांचे फोटो दाखवून फसवणूक
अग्रवाल अत्यंत नियोजनबद्ध रीतीने सापळा रचत होता. एक केंद्रीय मंत्री व मध्य प्रदेशातील निवासी राष्ट्रीय पक्षाच्या ताकतवर महिला नेत्यासोबतचे त्याचे काही फोटो आहेत. या फोटोंच्या भरवशावर तो आपली ओळख मोठी असल्याचे दाखवत अनेकांना नोकरी देण्याचा विश्वास देत होता. वास्तविकतेपासून दूर असलेले पीडित नोकरी मिळेल, या आशेने बळी ठरत होते.
...