लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यभरात होळीचा सण साजरा होत आहे. होळीदहन म्हणजे वाईट विचार, प्रथा, परंपरा आगीत जाळून राख करावी आणि दुसऱ्या दिवशी रंगोत्सवात सहभागी होऊन आनंद लुटावा. पण आजच्या (गुरुवारी) होळीच्या दिवशी विदर्भातील काही बेरोजगार तरुणांनी एकत्र येत आपल्या पदव्यांचीच होळी केली. विदर्भातील तरुणांना नोकऱ्या मिळत नसल्यामुळे या बेरोजगार तरुणांच्या पदव्या काही कामाच्या नाही, असे म्हणत विदर्भ राज्य आंदोलन समितीने बेरोजगारांच्या पदव्यांची होळी करून सरकारचा निषेध केला.नागपुरात संविधान चौकात विदर्भवादी कार्यकर्ते आणि बेरोजगार तरुणांनी पदव्यांची होळी केली. राज्य सरकार आणि केंद्र सरकार रोजगार निर्मितीत अपयशी ठरले आहेत. वर्षाला दोन कोटी बेरोजगार तरुणांना नोकऱ्या देणार, असे आश्वासन भाजपाने दिले. परंतु नोटाबंदी आणि जीएसटीमुळे नवीन नोकरी मिळणे दूर ज्या नोकऱ्या होत्या त्याही गमावण्याची पाळी आहे. विदर्भात उद्योग येत नसल्यामुळे येथील तरुणांना रोजगार उपलब्ध होत नाही. जोपर्यंत विदर्भ वेगळा होणार नाही, तोपर्यंत विदर्भाचा विकास होणार नाही आणि बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार नाही, असे मत विदर्भवादी तरुणांनी मांडले.नोकरी मिळत नसल्याने मेहनतीने घेतलेली पदवीही काही कामाची नाही. सरकारने विदर्भातील चार लाख नोकºया पळवल्या, असे म्हणत विदर्भातील स्थानिक नोकऱ्या विदर्भातील तरुणांनाच मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी केली.विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून स्वतंत्र विदर्भाची मागणी होत आहे. आज पदव्यांची होळी करून सरकारचा निषेध करत स्वतंत्र विदर्भाची पुन्हा एकदा मागणी करण्यात आली. नागपूरसह विदर्भातील सर्वच भागात पदव्यांची होळी करण्यात आल्याचे यावेळी विदर्भवादी कार्यकर्त्यांनी सांगितले.राम नेवले यांच्यासह आंदोलनात डॉ. श्रीनिवास खांदेवाले, अरुण केदार, अरविंद देशमुख, धर्मराज रेवतकर, राजकुमार नागुलवार, विजया धोटे, प्रभाकर काळे, मंगलमूर्ती सोनकुसळे, मुकेश मासूरकर, अभ्युदय कोसे, तारेश दुरुगकर, शुभम मून, राजेश बंड, रविना श्यामकुळे, डॉ. दीपक मुंडे, समीर खान, तौसीफ अहमद, हिमांशू देवघरे, रूपेश भोयर, ममता खापरे, कोमल दुरुगकर, अशोक धोटे, राजेश भांगे, अॅड. रेवाराम बेलेकर, रामेश्वर मोहबे, विजय जांगडे आदींचा सहभाग होता.
नागपुरात बेरोजगार तरुणांनी केली पदव्यांची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 7:58 PM
राज्यभरात होळीचा सण साजरा होत आहे. होळीदहन म्हणजे वाईट विचार, प्रथा, परंपरा आगीत जाळून राख करावी आणि दुसऱ्या दिवशी रंगोत्सवात सहभागी होऊन आनंद लुटावा. पण आजच्या (गुरुवारी) होळीच्या दिवशी विदर्भातील काही बेरोजगार तरुणांनी एकत्र येत आपल्या पदव्यांचीच होळी केली.
ठळक मुद्देडिग्री जलाओ आंदोलन : भाजपा सरकारचा निषेध