योगेश पांडे नागपूर : ज्या एकुलत्या एक चिमुकल्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले तो खेळत असताना त्याच्या बाललीला पाहताना रमणाऱ्या मातापित्यांच्या नशिबी त्याचे पार्थिव पाहण्याची दुर्दैवी वेळ आली. खेळत असताना पाचव्या माळ्यावरून पडून दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पाचव्या मजल्यावरून पडल्यावरदेखील त्याने आयुष्यासाठी संघर्ष केला. मात्र अखेर त्याला वाचविण्यात डॉक्टरांना अपयश आले.
शेख अहफाज (२) असे मृतक चिमुकल्याचे नाव आहे. तो शेख मोहरम उर्फ शेख ख्वाजा (४०, अशोक नगर, उप्पलवाडी क्वॉर्टर) यांचा एकुलता एक मुलगा होता. २८ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घरातच खेळत होता. खेळता खेळता तो बाल्कनीत गेला. तेथे तो गजाला पकडून उभा झाला व त्याचा तोल गेला. तोल जाऊन तो थेट पाचव्या माळ्यावरून खाली पडला. पडण्याचा आवाज आल्याने इमारतीतील लोक खाली आले. त्याच्या डोक्याला व शरीराच्या इतर अवयवांना जबर मार लागला होता. त्याला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला तातडीने मेडिकल इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र बुधवारी रात्री उपचारादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला. कपिलनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.