नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघात नेमके काय चालते हे पत्रकारांना कळत नाही. त्यामुळे अनेकदा विरोधात छापून येते. परंतु त्यावर संघाकडून खुलासा केला जात नाही. संघ ही जातीमुक्त सामाजिक संघटना असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केले. शंकरनगर येथील राष्ट्रभाषा संकुलातील श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात आयोजित कार्यक्रमात यंदाचा विदर्भ गौरव प्रतिष्ठानचा स्व. प्रकाश देशपांडे स्मृती कुशल संघटक पुरस्कार- २०१५ सामाजिक व सांस्कृतिक कार्यकर्ते दिलीप देवधर यांना त्यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार पुण्यप्रसून बाजपेयी, प्रतिष्ठानचे सचिव गिरीश गांधी आदी यावेळी उपस्थित होते.नुसत्या सिद्धांतावर राजकारण चालत नाही. भविष्याचाही विचार तितकाच महत्त्वाचा असतो. जिवंत मासा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला पोहतो तर मेलेला प्रवाहासोबत वाहून जातो. दिलीप देवधर प्रवाहाविरुद्ध जीवन जगत आहेत. त्यांनी संघ विचाराला जीवननिष्ठा म्हणून स्वीकारले आहे. त्यांचा विविध बाबींवरील अभ्यास असामान्य आहे. त्यांच्या मनात राष्ट्रभक्ती आहे. विविध उपक्रमाद्वारे त्यांनी अनेक चांगल्या गोष्टी समाजापुढे मांडल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना नागपुरात आणल्याचे त्यांनी सांगितले.नागपूर शहराशी लोकमतशी माझे जुने नाते आहे. संघाविषयी पुस्तक लिहित आहे. मी यानिमित्ताने दिलीप देवधर यांच्याकडून अधिक माहिती घेत आहे. ते एक उत्कृष्ट संघटक आहे. विदर्भ गौरव प्रतिष्ठानच्या पुरस्काराने त्यांना अधिक बळ मिळेल, असे मत पुण्यप्रसून बाजपेयी यांनी मांडले. गिरीश गांधी यांनी प्रास्ताविकातून देवधर यांच्या कार्याची माहिती दिली.उलटसुलट बातम्या प्रकाशित झाल्या तरी त्यावर संघ प्रतिक्रि या देत नाही. परंतु काहीतरी छापून येण्यापेक्षा वस्तुस्थितीची माहिती दिली जावी. या हेतूने संघाच्या हितासाठी काही बातम्या छापून याव्यात म्हणून संघाचेच काही नेते बातम्या देतात, असा गौप्यस्फोट दिलीप देवधर यांनी सत्काराच्या उत्तरात केला. हा माझा नव्हे तर कार्यकर्त्यांचा सत्कार असल्याचे त्यांनी सांगितले. २१ हजार रोख, स्मृतिचिन्ह शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. देवधर यांनी पुरस्काराची रक्कम ज्ञानयोद्धा संस्थेला अर्पण केली. संचालन ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी यांनी तर आभार जयंत खडतकर यांनी मानले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
संघ जातीवाद मुक्त संघटना
By admin | Published: March 30, 2015 2:28 AM