आॅनलाईन लोकमतनागपूर : केंद्र सरकारच्या ‘सर्वांसाठी घरे २०२२’ या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तरोडी येथील खसरा क्रमांक ६३ मधील २३.५ एकर जागेवर २३७४ घरांचा प्रकल्प उभारण्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.नवी दिल्ली येथे गेल्या बुधवारी केंद्रीय गृहनिर्माण व शहरी गरिबी निर्मूलन मंत्रालयाच्या झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. राज्य शासनाने या प्रकल्पाची केंद्र शासनाकडे शिफारस केली होती. त्यानुसार बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच या कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती नासुप्रचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.नासुप्रच्या अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाकरिता विविध पातळीवरील मंजुरी प्राप्त करून घेण्यासाठी व या प्रकल्पाच्या जमीन वापराचा बदल प्रस्ताव मंजूर करून या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे सादर करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यातर्फे या प्रकल्पाकरिता पाठपुरावा करण्यात आला होता.नासुप्रद्वारे निर्माण करण्यात येणाऱ्या प्रकल्पामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना लाभ मिळणार आहे. प्रस्तावित २३.५ एकर जागेवर २३७४ गाळे उभारण्यात येतील. सदर इमारत जी प्लस ४ या स्वरूपात राहणार आहे. त्यामध्ये बेडरूम, किचन, हॉल व प्रसाधनगृहाचा समावेश आहे. या संपूर्ण प्रकल्पातील मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे ‘सर्व सुविधायुक्त अशी घरे’ या दृष्टीने या प्रकल्पाकडे बघितल्या जात आहे. यात पावसाळी नाल्या, मलवाहिका, मलनिस्सारण केंद्र, डांबरी रस्ते, साईट डेव्हलपमेंट, दुकाने, सोसायटी कार्यालय तथा योगा केंद्र, कंपाऊंड वॉल, रुफ सोलर पॉवर, रेन वॉटर हार्वेस्टिंग इत्यादी गोष्टींचा यामध्ये समावेश राहणार आहे. या प्रकल्पातील गाळ्यांची अनुमानित किंमत प्रत्येकी ७.५ लाख आहे व यावर केंद्र व राज्य शासनामार्फत एकूण २.५ लाखाचे अनुदान प्राप्त होईल. नासुप्रद्वारे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मौजा वाठोडा येथे २६४ गाळ्यांचे निर्माण कार्य सुरू झाले असून, मौजा वांजरी येथे ९६० गाळ्यांचे निर्माण कार्य लवकरच सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. याव्यतिरिक्त तरोडी खुर्द येथे ९४२ घरांचा प्रस्ताव प्रस्तावित असल्याचे म्हैसेकर यांनी सांगितले.
नागपुरात केंद्र शासनाची २३७४ घरांच्या प्रकल्पाला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 6:57 PM
केंद्र सरकारच्या ‘सर्वांसाठी घरे २०२२’ या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तरोडी येथील खसरा क्रमांक ६३ मधील २३.५ एकर जागेवर २३७४ घरांचा प्रकल्प उभारण्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
ठळक मुद्देदुर्बल घटकातील लोकांना मोठा दिलासानासुप्र लवकरच कामाला सुरुवात करणार