नागपूर : केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या काफील्यातील एका वाहनाला शनिवारी रात्री अपघात झाला. या अपघातात एक जण किरकोळ जखमी झाला.
सूत्रांच्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या वाहनासह त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या रक्षकांच्या वाहनांचा ताफा शनिवारी रात्री ११ च्या सुमारास सावरकर नगर चौकातून गडकरी यांच्या वर्धा मार्गावरील निवासस्थानाकडे जात होता. छत्रपती चौकात सिग्नल बंद झाल्यामुळे समोर धावणाऱ्या एका ट्रक चालकाने करकचून ब्रेक मारले.
अचानक ट्रक समोर थांबल्यामुळे सर्वात पुढे असलेल्या पोलिसांच्या (पायलट) वाहन चालकाने प्रसंगावधान राखून बाजूने वाहन काढले. त्यामुळे ट्रकला कट लागून पायलट कारचे नुकसान झाले. चालकाला किरकोळ दुखापत झाली. मात्र चालकाने दाखवल्या प्रसंगावधानामुळे मागची सर्व वाहने सुरळीत पायलट वाहनाच्या मागे निघाली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
विशेष म्हणजे, अपघात होऊन अडीच-तीन तास झाले तरी मध्यरात्रीपर्यंत धंतोली पोलीस किंवा नियंत्रण कक्षातून या अपघाताची सविस्तर माहिती मिळू शकली नाही.