मुंबई: केंद्रीय वाहतूक मंत्री गेल्या आठवड्यात त्यांच्या विधानांमुळे चर्चेत राहिले. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपाला पराभव पत्करावा लागल्यानंतर गडकरींनी केलेली विधानं चर्चेत होती. विशेष म्हणजे यातील अनेक विधानं पक्ष नेतृत्त्वावर अप्रत्यक्ष निशाणा साधणारी होती. आगामी लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधानपदासाठी संघाकडून गडकरींचं नाव पुढे केलं जाणार असल्याची चर्चा सुरू असताना ही विधानं करण्यात आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.पडद्यामागून सूत्र हलवण्यात नितीन गडकरी प्रवीण समजले जातात. त्यामुळेच गेल्या काही दिवसांमध्ये गडकरींच्या बदललेल्या सुरांमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. गडकरी पक्ष नेतृत्त्वावर नाराज आहेत की त्यांच्या मनात वेगळं काही आहे, असे प्रश्न भाजपा कार्यकर्त्यांसहित सर्वांनाच पडले आहेत. गडकरी यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी अगदी उत्तम संबंध आहेत. मात्र मोदी-शहा ही जोडगोळी संघाला फार किंमत देत नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांमधील गडकरींच्या विधानांमुळे चर्चेला उधाण आलं आहे.
1. मला नेहरुंची भाषणं आवडतात'यंत्रणा सुधारण्यासाठी दुसऱ्यांकडे बोटं का दाखवता? स्वत:कडे बोट का दाखवत नाही? जवाहरलाल नेहरु म्हणायचे भारत हा देश नाही, तर लोकसंख्या आहे. इथल्या प्रत्येकाचा प्रश्न, त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत. नेहरुंची भाषणं मला खूप आवडतात. त्यामुळे देशासमोर समस्या निर्माण होऊ नये, याची काळजी मी घेऊ शकतो.'
2. पराभवाला जबाबदार कोण? 24 डिसेंबरला एका कार्यक्रमात गडकरी म्हणाले, 'जर मी पक्षाचा अध्यक्ष आहे आणि माझे खासदार आणि आमदार चांगलं काम करत नसतील, तर जबाबदार कोण?'
3. यशाचे दावेदार अनेक, अपयश मात्र अनाथपुण्यातील एका कार्यक्रमात गडकरींनी यश-अपयशावर सूचक भाष्य केलं. गडकरी म्हणाले, 'यशाचे अनेक दावेदार असतात. मात्र अपयश आल्यावर कोणीच सोबत नसतं. यशाचं श्रेय घेण्यासाठी लोकांची रांग लागते. मात्र अपयशाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी कोणीच पुढाकार घेत नाही. सगळेच एकमेकांकडे बोट दाखवतात.'
4. जिथे आहे, तिथे आनंदी आहेपंतप्रधानपदासाठी आपण दावेदार नसल्याचं स्पष्ट करताना आपण जिथे आहोत, तिथे आनंदी असल्याचं म्हटलं होतं. 'मला गंगा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. ऍक्सेस हायवे कंट्रोलची उभारणी करायची आहे. चारधाम रोड आणि इतर प्रकल्प मार्गी लावायचे आहेत. मी जे काम करतो आहे, तिथे आनंदी आहे. मला हाती घेतलेली कामं पूर्ण करायची आहेत.'
5. भाजपाच्या काही नेत्यांनी तोंड बंद ठेवायला हवंनितीन गडकरींनी एका मुलाखतीत पक्षातील काही नेत्यांनी तोंड बंद ठेवायला हवं, असं म्हटलं. 'आमच्याकडे इतके नेते आहेत. त्यांना टीव्ही पत्रकारांसमोर बोलायला आवडतं. त्यामुळे त्यांना काहीतरी काम देण्याची आवश्यकता आहे. काही नेत्यांच्या तोंडात कापडाचा बोळा घालून त्यांचं तोंड बंद करण्याची गरज आहे.'