नागपूर : नागपूर शहर, ग्रामीण व अमरावती आरटीओ मिळून १२ जिल्हे व तीन विभागीय कार्यालयाचा कार्यभार अमरावतीचे प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गिते यांच्याकडे सोमवारी सोपविण्यात आला. केंद्रीय परिवहन मंत्री व उपमुख्यमंत्र्याच्या शहर असताना सुद्धा आरटीओला अधिकारी मिळत नसल्याने आश्चर्यव्यक्त केले जात आहे.
परिवहन खात्यातील एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याकडून पैसे घेऊन बदली करण्याच्या प्रकरणाची शहर पोलिसांनी ‘एसआयटी’मार्फत चौकशी करून बुधवारी शहर आरटीओ कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ, संकेत गायकवाड व राजू नागरे यांची तडकाफडकी बदली के ली. याला चार दिवस होत नाही तोच सोमवारी अमरावती आरटीओचे परिवहन अधिकारी गिते यांच्याकडे नागपूर शहर व ग्रामीण आरटीओ कार्यालयाचा अतिरीक्त पदभार सोपविण्यात आला.
विशेष म्हणजे, गडचिरोली आरटीओ कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांच्याकडे काही महिन्यांपूर्वी ग्रामीण आरटीओ कार्यालयाचा तर, पूर्व नागपूरच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भूयार यांच्याकडे शहर आरटीओ कार्यालयाचा अतिरिक्त पदभार आला. दोन्ही कार्यालयात विकासात्मक कामांना वेग आला होता. ग्रामीण आरटीओकडून समृद्धी महामार्गावरील अपघता रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात होते. त्याला यशही आले होते.
शिवाय, ओव्हरलोड वाहनांवर कारवाईचा धडका सुरू असतानाच चव्हाण यांच्याकडून ग्रामीण आरटीओचा पदभार काढला. तर, भूयार यांच्याकडे शहर आरटीओचा अतिरीक्त कार्यभार आल्यानंतर त्यांनी कार्यालयाचा चेहरमोहर बदलला. कार्यालयाचे कामकाज पारदर्शक केले. अपघात रोखण्यासाठी सावित्री पथकापासून ते इतरही योजना त्यांनी हाती घेतल्या. परंतु सोमवारी त्यांच्याकडूनही शहराचा पदभार काढून गीते यांच्याकडे दिला.
-तीन विभागीय कार्यालय, अधिकारी मात्र एक!अमरावती आरटीओ कार्यालयांतर्गत अमरावतीसह अकोला, वाशिम, बुलढाणा व यवतमाळ असे पाच जिल्हे, नागपूर शहर आरटीओ कार्यालयांतर्गत शहरासह वर्धा जिल्हा तर, नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयांतर्गत नागपूर ग्रामीणसह वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली असे सहा एकूण १२ जिल्हे व तीन विभागीय आरटीओ कार्यालयाचा कार्यभार परिवहन विभागाने एकमात्र गीते या अधिकाऱ्याकडे सोपविला. परिवहन विभागाच्या या अजब निर्णयामुळे आरटीओच्या वरीष्ठ अधिकाºयांमध्ये प्रचंड नाराजी आहे.