लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाविरोधाच्या लढ्यात पोलीस, प्रशासन, वैद्यकीय यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्य करत आहे. या यंत्रणेला सहकार्य करण्यासाठी एनसीसी कॅडेटस्नेदेखील पुढाकार घेतला आहे. एनसीसी-योगदान या उपक्रमांतर्गत नागपूर शहरात शेकडो कॅडेटस् प्रशासनाची मदत करत आहेत. विशेषत: गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टिन्स्सिन्ग राखण्यावर ते विशेष भर देत आहेत.प्रशासनावरील ताण बघता एनसीसीने देशपातळीवर ‘एनसीसी-योगदान’ हा उपक्रम सुरू केला आहे. नागपुरातील युनिटमध्येदेखील यासाठी पुढाकार घेण्यात आला. १४ एप्रिलपासून एनसीसीचे ३०० हून अधिक कॅडेटस् शहरातील विविध स्वस्त धान्य वितरण केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. या केंद्रांवर गरजू नागरिकांची गर्दी होत आहे. अशास्थितीत कोरोनाच्या संसर्गाचा धोका आहे. हे कॅडेटस् तेथे सोशल डिस्टिन्स्सिन्ग पाळण्यात मदत करत आहेत. याशिवाय सामाजिक जनजागृती करण्यातदेखील हे कॅडेटस् मदत करत आहेत. गरीब व गरजूंना मदत सामुग्रीचे वितरण करण्यात आणि विनाकारण बाहेर पडणाऱ्यांना समजवून घरी पाठविण्याचे कार्यदेखील ते करत आहेत. यात १०० हून अधिक विद्यार्थिनींचादेखील समावेश आहे.लवकरच ग्रामीण भागातदेखील असा उपक्रम राबविण्यात येणार आहे. एनसीसीचे ब्रीदवाक्य हे एकता व शिस्त हे आहे. या कठीण परिस्थितीत समाजात एकता कायम राहावी व सगळीकडे शिस्तीचे पालन व्हावे याच भावनेतून एनसीसीचे कॅडेटस् जनतेत जाऊन काम करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
नागपुरात एनसीसी कॅडेटस्चे अनोखे ‘योगदान’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 11:21 AM