लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रविवार २० डिसेंबर रोजी एक अनोखा विवाह समारंभ आयोजित करण्यात आला आहे. मतिमंद तसेच मूकबधिर अनाथ मुलांच्या संगोपनासोबतच पुनर्वसनासाठी नि:स्पृहपणे कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवी शंकरबाबा पापळकर यांची मानस कन्या वर्षा व अनाथालय बालगृहातील त्यांचा मानसपुत्र समीर यांचा हा विवाह आहे. विशेष म्हणजे गृहमंत्री अनिल देशमुख हे पत्नी आरतीसह कन्यादान करणार आहेत, तर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे हे वरपिता म्हणून जबाबदारी पार पाडतील.
रवींद्र ठाकरे व त्यांच्या पत्नी ज्योत्स्ना ठाकरे यांनी मंगळवारी समीर व वर्षा यांचे औक्षण करून विवाह समारंभाची औपचारिक सुरुवात केली. तर अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी रिद्धी देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले. वर्षा २३ वर्षांअगोदर नागपूर रेल्वेस्थानकावर बेवारस स्थितीत सापडली होती. अमरावती येथील स्वर्गीय अंबादासपंत वैद्य मतिमंद, मूकबधिर अनाथालय येथे शंकरबाबा यांनी तिचा सांभाळ करून तिला वडिलांचे नाव दिले. समीरदेखील डोंबिवलीत बेवारस सापडला होता. शंकरबाबा यांनी त्याचादेखील सांभाळ केला. आता वर्षा व समीर यांचा २० डिसेंबर रोजी विवाह होणार आहे.