योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मंगळवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालामध्ये नागपूर विभागात एक अनोखा विक्रम घडला. मागील वर्षीहून जास्त विषयांचा निकाल १०० टक्के लागला असून, एक नवीन विक्रम प्रस्थापित झाला आहे. १३५ पैकी तब्बल ८२ म्हणजेच ६०.७४ टक्के विषयांचा निकाल ‘सेंट परसेंट’ लागला आहे. मागील वर्षी हाच आकडा ५१ इतका होता. दरवर्षी त्रास देणाऱ्या इंग्रजीतदेखील मूल्यांकनाच्या नवीन प्रणालीमुळे विद्यार्थ्यांची नाव किनाऱ्यावर लागली असून, ९९.९३ टक्के विद्यार्थी त्यात उत्तीर्ण झाले आहेत.
बारावीत विद्यार्थ्यांना गणित व इंग्रजीची सर्वाधिक भीती वाटत असते. मागील वर्षी इंग्रजीचा निकाल ८९.७६ टक्के, तर गणिताचा निकाल ९८.५६ टक्के लागला होता. यंदा दोन्ही विषयांचा निकाल अतिशय चांगला लागला असून, गणितात ९९.९७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
याशिवाय भौतिकशास्त्र ९९.९७%, जीवशास्त्र ९९.९७% व रसायनशास्त्र ९९.९७% या विषयांचा निकालदेखील मागील वर्षीच्या तुलनेत वाढला आहे. मराठीचा निकाल ९९.९३ टक्के तर हिंदीचा निकाल ९९.८४ टक्के लागला आहे. संस्कृतमध्ये १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
वर्षनिहाय सेंट परसेंट निकाल
वर्ष - विषय
२०१९ - ३९
२०२० - ५१
२०२१ - ८२
तीन विषयांना प्रत्येकी एकच परीक्षार्थी
यंदा १३१ पैकी ३० विषयांमध्ये ५० किंवा त्याहून कमी परीक्षार्थी होते. जर्मन, व्होकल लाइट म्युजिक व ब्यूटि अॅण्ड वेलनेस या विषयांत तर एकच विद्यार्थी होता. विभागात सर्वात अधिक एक लाख ४० हजार ३९५ विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयांची परीक्षा दिली, तर ९३ हजार ४९२ विद्यार्थी मराठीच्या परीक्षेला प्रविष्ट झाले होते.
सर्वच विषयांची भरारी
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सर्वच विषयांचा निकाल चांगला लागला आहे. बँकिंग फायनान्स सर्व्हिसेसचा (९७.५४ टक्के) निकाल सर्वात कमी लागला आहे. यंदाच्या मूल्यांकनात प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या यांच्या अंतर्गत मूल्यमापनाचा विचार करण्यात आला व महाविद्यालयांनीत या सूत्रानुसार गुणदान केले. सोबतच दहावीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण, अकरावीच्या अंतिम निकालातील विषयनिहाय गुणदेखील विचारात घेण्यात आले. महाविद्यालयांनीच गुणदान केले असल्याने यंदा विषयनिहाय निकालाची टक्केवारी इतकी वाढल्याची दिसून येत आहे, असे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले.
मुख्य विषयांचे निकाल
विषय - टक्केवारी (२०२१) - टक्केवारी (२०२०)
इंग्रजी - ९९.९३ - ८९.७६
गणित - ९९.९७ - ९८.५६
भौतिकशास्त्र- ९९.९७ - ९८.६३
जीवशास्त्र - ९९.९७ - ९९.२१
रसायनशास्त्र- ९९.९७ - ९९.०४
मराठी- ९९.९३ - ९६.९८
हिंदी - ९९.९४ - ९८.९३
संस्कृत - १०० - ९९.७०