लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तो मनाने तसा खेळाडू आहे. म्हटले तर विद्यार्थी आणि कर्माने माणुसकीची भावना जपणारा पालक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वृत्तीने शिक्षकदेखील आहे. कुठलीही शास्त्रोक्त पदवी नाही, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा गंध नाही. मात्र जिद्द, परिश्रम आणि ‘व्हिजन’ हीच त्याची शक्ती. याच त्रिसूत्रीतून त्याने अगदी तळागाळातून विद्यार्थी शोधले असून त्यांना शिक्षण अन् खेळाचे संस्कार देण्यासाठी झटतो आहे. मार्ग कठीण आहे, समस्या अनंत आहेत, पण हृदयात वसलेली शिक्षकाची प्रामाणिक भावना संघर्षाला बळ देत आहे. यातूनच एक शिक्षक, विद्यार्थी आणि पालक अशा तिन्ही बाजू सांभाळण्याची कसरत सुरू आहे. ही कहाणी आहे भंडारा जिल्ह्यातील व नागपूर विद्यापीठातील जनसंवाद विभागातील विद्यार्थी जयंत तांडेकर यांची.मूळ भंडारा जिल्ह्यातील सासरा या लहानशा गावातील असलेल्या जयंतला लहानपणापासूनच क्रीडाप्रकारांची आवड होती. योग्य प्रशिक्षणाअभावी ‘अॅथ्लेटिक्स’मधील त्याच्या अनेक चांगल्या संधी हुकल्या. नागपूर विद्यापीठातून मराठीत पदव्युत्तर शिक्षण घेत असताना क्रीडास्पर्धांत त्याने चमकदेखील दाखविली. मात्र नेमकी गुडघ्याला दुखापत झाली अन् राज्यपातळीवर जाण्याचे त्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.मात्र त्याने हार मानली नाही अन् आपण दुसऱ्यांना घडवू शकतो हा विश्वास पक्का होत गेला. सुरुवातीला पोलीस प्रशिक्षण अकॅडमीमध्ये त्याने क्रीडाप्रकार शिकविण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने जवळच्या लोकांकडून अक्षरश: पैसे उधार घेतले व लहान गावातील मुलांना एकत्रित आणून त्यांना क्रीडा प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये तर त्याने १६ जण आपल्या घरी आणले व त्यांना ‘अॅथ्लेटिक्स’चे प्राथमिक प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. यातील तीन मुलांमधील ‘टॅलेन्ट’ त्याने हेरले व त्यांना शिक्षणासाठी दत्तक घेण्यासाठी धडपड सुरू केली. या मुलांचे पालक व शाळेकडून यासाठी विरोध झाला. मात्र मोठ्या प्रयत्नांनी त्याने त्यांचे मन वळविले अन् एका नव्या प्रवासाला सुरुवात झाली.मुलांच्या शिक्षणाचीदेखील केली सोयमुलांना ‘अॅथ्लेटिक्स’चे प्रशिक्षण देत असताना मुलांच्या शिक्षणाचीदेखील सोय व्हावी म्हणूनदेखील जयंतने प्रयत्न सुरू केले. शहरातील एका अनाथालयातील रिकामी पडलेली जागा त्याला राहण्यासाठी मिळाली. तिघांचा त्याने शाळेतदेखील प्रवेश करवून दिला. तसेच जयंतने स्वत:देखील जनसंवाद विभागात प्रवेश घेतला. स्वत:चा, विद्यार्थ्यांचा अभ्यास सांभाळून तो त्यांना नियमितपणे क्रीडाप्रकारांचे प्रशिक्षण देत आहे. विशेष म्हणजे यातील एका ११ वर्षीय विद्यार्थ्याने पुण्यातील राज्यस्तरीय अॅथ्लेटिक्स स्पर्धेत पहिला क्रमांकदेखील पटकाविला.