नागपूर : एरवी प्रवासी आणि पर्यटकांना घेऊन धावणाऱ्या मेट्राेमध्ये मंगळवारी अनाेखा याेग साधला. शेकडाे नागरिकांनी धावत्या मेट्राेमध्ये याेगसाधना करून आराेग्यदायी जगण्याचा संदेश दिला. निमित्त हाेते जागतिक याेग दिनाचे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ऑगस्ट महिन्यात सुरू होणारा शताब्दी महोत्सव तसेच यंदाच्या खेलो इंडिया विद्यापीठ योगासन स्पर्धेत विद्यापीठाचे सुवर्ण कामगिरीचे औचित्य साधून यंदाचा जागतिक योग दिवस धावत्या मेट्रोत साजरा करण्यात आला. महामेट्रो आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने या आयोजनासाठी पुढाकार घेतला होता. या अभियानाचा प्रारंभ फ्रीडम पार्क झिरो माइल येथून करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त विजय मुनिश्वर आणि मेट्रोचे प्रकल्प महाव्यवस्थापक सुधाकर उराडे आदी उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्ताने ७५ मिनिटे ‘योगा ऑन व्हील' अशी कार्यक्रमाची थिम होती. विद्यापीठाच्या विविध प्रशिक्षण केंद्राचे खेळाडू आणि भारतीय खेळ प्राधिकरणाचे नामवंत खेळाडू, शहरातील शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त, अर्जुन पुरस्कार प्राप्त, रासेयोचे स्वयंसेवक, विद्यार्थी विकास विभागाचे विद्यार्थी, विद्यापीठाचे सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच सहा ते ६० वर्षांपर्यंतच्या नागरिकांची उपस्थिती होती.