नागपूर : युगानुकूल एकेका विषयावर खंडितपणे विचार करून संशाेधन करण्याचा हा काळ नाही. साकल्याने, एकमेकांना पूरक विचार करीत संशाेधन करणे ही काळाची गरज आहे. भविष्यात विद्यापीठ आणि संशाेधन मंडळाने संयुक्तपणे प्रकल्प राबविण्याची गरज असल्याचे विचार कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेकचे कुलगुरू डाॅ. श्रीनिवास वरखेडी यांनी व्यक्त केले.
विदर्भ संशाेधन मंडळाच्या संशाेधन क्षितिज-२०१९ या वार्षिकांकाचा विमाेचन साेहळा रविवारी मंडळाच्या सभागृहात पार पडला. यावेळी डाॅ. वरखेडी यांनी विचार मांडले. अनेक विद्यापीठांमध्ये, संशाेधन संस्थांमध्ये संशाेधनात्मक प्रकाशने प्रकाशित हाेत असतात. मात्र ही प्रकाशने एकेका विषयावर केंद्रित असतात. विदर्भ संशाेधन मंडळाने एकाच प्रकाशनात सर्व विषयाचा समावेश केल्याचे काैतुक त्यांनी केले. तत्पूर्वी संपादक डाॅ. अजय कुळकर्णी यांनी वार्षिकांकाबाबत माहिती सांगितली. यानंतर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धाचे प्रा.डाॅ. सतीश पावडे यांना क्रांतिवीर बाळाजी हुद्दार स्मृतिग्रंथ पुरस्कार प्रदान करण्यात आला. डाॅ. प्रज्ञा आमटे यांच्या संतांची नवसमाज निर्मिती व डाॅ. रेणुका यांच्या ध्वनी व वक्राेक्ती या ग्रंथाला डाॅ. सुरेश डाेळके स्मृतिग्रंथ पुरस्कार प्रदान करण्यात आला. डाॅ. मृदुला नासेरी व डाॅ. स्मिता हाेटे यांनी ग्रंथ प्रतियाेगितेचे परीक्षण केले. अध्यक्षीय भाषणात डाॅ. मदन कुळकर्णी यांनी संशाेधन मंडळाच्या विविध प्रकल्पांचे काैतुक केले. त्यांनी वारसा दर्शन या प्रकल्पाचा आवर्जून उल्लेख केला. प्रास्ताविक, संचालन व आभारप्रदर्शन मंडळाचे कार्यवाह डाॅ. राजेंद्र वाटाणे यांनी केले. डाॅ. शेषशयन देशमुख यांनी कार्यक्रमाच्या आयाेजनात भूमिका बजावली.