लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : देशाला विश्वगुरु करण्यासाठी प्रामाणिक विद्यार्थ्यांची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांवर शैक्षणिक संस्कार करणाऱ्या विद्यापीठांमध्ये यासाठी अगोदर पारदर्शकता येणे आवश्यक आहे. कुठल्याही दबाव, भीती शिवाय प्रामाणिकपणे कार्य झाले पाहिजे, असे मत तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०५ व्या दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहात शनिवारी पार पडलेल्या या सोहळ्याला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांची अध्यक्षस्थानी उपस्थिती होती. दीक्षाभूमी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचा नेत्रहीन विद्यार्थी राहुल बजाज याला ‘एलएलबी’मध्ये सर्वाधिक ‘सीजीपीए’ प्राप्त केल्याबद्दल २० पदके व पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले. नागपूर विद्यापीठात मी शिक्षण घेतले आहे व या विद्यापीठामुळेच मी घडलो. विद्यापीठाने मोठी प्रगती केली आहे. मात्र आणखी सुधारणांची आवश्यकता आहे. नागपूर विद्यापीठ देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ झाले पाहिजे, असे बनवारीलाल पुरोहित म्हणाले.देशाला संपन्न व समृद्ध करण्यासाठी तरुणांची भूमिका महत्त्वाची असते. विद्यार्थ्यांनी आपले राहणीमान साधे ठेवणे अपेक्षित आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी प्रामाणिकपणाची कास धरली पाहिजे. प्रामाणिकपणाचा मार्ग कठीण असतो, मात्र तो शाश्वत असतो. यासाठी विद्यार्थ्यांनी माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची प्रेरणा डोळ्यासमोर ठेवली पाहिजे, असा सल्लादेखील त्यांनी दिला.नागपूर विद्यापीठाने ‘डिजिटलायझेशन’मध्ये सर्व विद्यापीठांहून सरस काम केले असून आता पदवीदेखील ‘आॅनलाईन’ मिळणार आहे. नागपूर विद्यापीठ राज्यात सर्वात लवकर निकाल जाहीर करणारे विद्यापीठ आहे, अशी माहिती डॉ.काणे यांनी दिली. यावेळी मंचावर प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले, कुलसचिव डॉ.पूरणचंद्र मेश्राम, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.नीरज खटी, वित्त व लेखा अधिकारी डॉ.राजू हिवसे, तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांच्यासह व्यवस्थापन परिषद सदस्य व चार विद्याशाखांचे अधिष्ठाता उपस्थित होते. प्रा.कोमल ठाकरे व वर्षा देशपांडे यांनी संचालन केले.